Nashik Bribe News : ‘त्या’ लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास | पुढारी

Nashik Bribe News : 'त्या' लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिंचन विहीर बांधण्याचे प्रकरण मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली. मनोहर जगन्नाथ हिरे (रा. सुरगाणा) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याला न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

धनराज लक्ष्मण भोये यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला हाेता. तो मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तत्कालीन ग्रामसेवक हिरेने भोये यांच्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १९ डिसेंबर २०१६ रोजी सुरगाणा पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला होता. तेथे लाच घेताना हिरेला रंगेहाथ पकडले होते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी तीन साक्षीदार तपासले. यात गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी हिरेला शिक्षा सुनावली. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे प्रदीप काळोगे व ज्योती पाटील यांनी तपास व पाठपुरावा केला.

हेही वाचा :

Back to top button