Tamil Nadu rains | तामिळनाडूत अतिवृष्टीने हाहाकार! १० मृत्यू, ताम्रपर्णी नदीला पूर | पुढारी

Tamil Nadu rains | तामिळनाडूत अतिवृष्टीने हाहाकार! १० मृत्यू, ताम्रपर्णी नदीला पूर

पुढारी ऑनलाईन : तमिळनाडूत अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. पाऊस आणि पुराशी संबंधित विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत आतापर्यंत १० जणांचा बळी गेला. गेल्या दोन दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडूचे मुख्य सचिव शिव दास मीना यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत तामिळनाडूतील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Tamil Nadu rains)

संबंधित बातम्या 

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुसळधार पावसाचा वर्तवलेला अंदाजदेखील ‘चुकीचा’ ठरला आहे. कारण गेल्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. “पावसामुळे तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. काहींचा मृत्यू भिंत कोसळल्याने, तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला आहे,” असे त्यांनी शिव दास मीना यांनी सचिवालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील पूरस्थितीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, दक्षिणेकडील जिल्हे, विशेषतः तिरुनेलवेली आणि तुतीकोरीनमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली असून पूर आला आहे. दरम्यान, तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी केपी कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती देताना सांगितले, की “येथील एकूण मृतांची संख्या ९ वर गेली आहे…”

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तिरुनेलवेली आणि तेनकासी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे थुथुकुडी जिल्ह्यात सर्वांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आज बुधवारी रेल्वे सेवेलाही फटका बसला. दक्षिण रेल्वेने रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची यादी जाहीर केली आहे. नागरकोइल-कन्याकुमारी एक्स्प्रेस स्पेशल आणि नागरकोइल-तिरुनेलवेली एक्स्प्रेस स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिरुनेलवेली येथून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदीला पूर आला आहे. राज्यातील अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेला असून पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. (Tamil Nadu rains)

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घेतली पीएम मोदींची भेट, २ हजार कोटींच्या मदतीची मागणी

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये तात्काळ मदतकार्य हाती घेण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची आपत्कालीन मदतची मागणी केली. याबाबत त्यांनी निवेदन सादर केले. “तिरुनेलवेली आणि थुथुकुडीला एकाच दिवशी संपूर्ण वर्षभराचा पाऊस पडल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम झाला आहे,” असे स्टॅलिन यांनी आदल्या दिवशी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button