

गांधीनगर/अयोध्या, वृत्तसंस्था : गुजरातेतील सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय दरवाजावरून 25 सप्टेंबर 1990 रोजी राममंदिर आंदोलनासाठी रथयात्रा सुरू झाली होती. आता राम मंदिर पूर्णत्वानिमित्त 8 जानेवारीला पुन्हा अशीच गुजरात ते अयोध्या रथयात्रा काढली जाणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील 14 शहरांतून 1400 कि.मी.चा प्रवास पूर्ण करून ही रथयात्रा 20 जानेवारी रोजी रामनगरी अयोध्येत दाखल होईल. अहमदाबादेतील रामचरितमानस ट्रस्टतर्फे हे आयोजन आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्टतर्फे रामलल्लाला 51 लाख रुपये अर्पण केले जातील.
आडवाणींना निमंत्रण
विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना दिले. राम मंदिर ट्रस्ट चंपत राय यांनी याआधी सांगितले होते की, आडवाणी (वय 96) तसेच मुरली मनोहर जोशी (वय 90) या नेत्यांना मी सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ नका म्हणून सांगितले होते. अयोध्येत थंडी फार आहे आणि वयोमानाने या दोन्ही नेत्यांना ती मानवणार नाही. राय यांच्या या वक्तव्याने वाद उद्भवला होता. विहिंपने आडवाणींना पत्रिका दिली आहे.
देवेगौडांनाही बोलावणार
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या भेटीसाठी व त्यांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तीन जणांवर खास जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
थायलंडमधून रामाला विशेष भेट
बँकॉक : रामलल्लाच्या अभिषेकासाठी थायलंडकडून तेथील दोन नद्यांचे पाणी याआधीच आलेले आहे. फिजी, मंगोलिया, डेन्मार्क, भूतान, रोमानिया, हैती, ग्रीस, अल्बानिया आदी 154 देशांतूनही तेथील नद्यांचे पाणी आलेले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या थायलंड शाखेचे अध्यक्ष सुशील कुमार सराफ यांनी सांगितले की, अयोध्येसाठी येथील एक विशिष्ट मातीही आता पाठविली आहे. बँकॉकमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.
आयएएस अधिकार्याकडून आयुष्याची कमाई रामचरणी
अयोध्या, वृत्तसंस्था : 'निवृत्तीनंतरही उदंड पैसा मिळतो आहे. सगळेच रामाने दिलेले आहे, त्याचे त्याला अर्पण करावे म्हणतो…' केंद्र सरकारमध्ये गृह सचिव या अत्यंत वरच्या पदावर राहिलेले आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन असे वरचेवर म्हणत असत आणि ते त्यांनी खरे करून दाखविले.
5 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रामचरितमानस या धातूग्रंथाचे अर्पण ते रामलल्लासमोर करतील. अक्षरश: सुवर्णअक्षरांनीच प्रत्येक पान लिहिलेले आहे. लक्ष्मीनारायणन मूळ चेन्नईचे. पत्नी सरस्वतीसह ते दिल्लीत राहतात. दोघांना एक कन्या आहे. प्रियदर्शिनी… ती अमेरिकेत असते. रामाला देताय ना… देऊन टाका पप्पा सगळे. मला नकोय काही, ही तिची प्रतिक्रिया..!
151 किलो वजनाचा ग्रंथ
140 किलो तांबे आणि 7 किलो सोने त्यावर खर्ची पडलेले आहे. अन्य मौल्यवान धातूंचा वापरही आहेच. 151 किलो वजनाचा हा ग्रंथ आहे.