Nashik News : १२ हजारहून अधिक महिलांचा असेल सहभाग, धर्म साेहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Nashik News : १२ हजारहून अधिक महिलांचा असेल सहभाग, धर्म साेहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

 नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवाजय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने कुंभमेळा मैदान (तपोवन) येथे दि. १७ ते २४ डिसेंबर दरम्यान जय श्रीराम निष्काम कर्मयाेगी धर्म साेहळा आयाेजित करण्यात आला आहे. निष्काम कर्मयाेगी जगद्गुरू जनार्दन स्वामी माैनगिरी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यात १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ होणार आहे. बांबूपासून खास पद्धतीने तयार केलेला राजस्थानी पद्धतीचा कामट्यांचा यज्ञमंडप तब्बल ११० बाय ११० फुटांचा बांधण्याचे काम सुरू आहे. या महायज्ञात ४३२ जाेडप्यांसह १२ हजारहून जास्त महिला सहभागी होणार आहेत. पुण्यप्राप्ती, व्यसनमुक्त समाज व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी या धर्म साेहळ्याचे आयाेजित करण्यात आले आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सद्गुरू श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हाेणाऱ्या या सोहळ्यात सलग आठवडाभर १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ होणार आहे. सकाळ सत्र व दुपार सत्र असे दिवसातून दाेन वेळा हा लक्षवेधी महायज्ञ होणार आहे.

यज्ञाचे पौरोहित्य नाशिक शहरातील प्रसिद्ध पंडित विलासशास्त्री कुलकर्णी (गुरुजी) हे करणार आहेत. या साेहळ्यात ५३ तालुक्यांतून ५ लाखांहून अधिक भाविक सहभागी होणार असून, या साेहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याप्रसंगी महायज्ञाबरोबरच जपानुष्ठान,अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, हस्तलिखित नामजप, भागवत पारायण, अभिषेक यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सोहळा यशस्वीतेसाठी जय बाबाजी भक्त परिवार परिश्रम घेत आहे.

दिवसभरात दोनवेळा महायज्ञ

प्रधान यजमान व सहप्रधान यजमान असे ४३२ जाेडपे तसेच महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त महिलांना या यज्ञात संधी देण्यात आलेली आहे. प्रत्येक कुंडाजवळ ७ महिला याप्रमाणे १०८ कुंडांवर महिला सहभागी होणार असून, दिवसभरात दोन वेळा महायज्ञ होईल. आगपेटीचा उपयाेग न करता, मंत्राेच्चारात लाकडावर लाकूड घासून यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news