‘वालचंदनगर’च्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन | पुढारी

‘वालचंदनगर’च्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी वालचंदनगर कंपनीच्या (ता. इंदापूर) कामगारांनी पुकारलेल्या संपाला 20 दिवस झाले, तरी अद्याप व्यवस्थापनाकडून तोडगा काढला जात नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी सोमवारी (दि. 11) अर्धनग्न होत व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध नोंदवला.

इस्त्रोच्या चांद्रयान, गगनयान, मंगळयान आदी महत्त्वाकांक्षी मोहिमांमध्ये महत्त्वाची उपकरणे बनवणार्‍या वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी पगार व हक्काच्या थकीत रकमेसाठी संप पुकारला आहे. या संपात 630 कामगार सहभागी झाले आहेत. गेल्या 20 दिवसांपासून संप सुरू असून, व्यवस्थापनाने अद्याप कामगारांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी सोमवारी अर्धनग्न आंदोलन करून व्यवस्थापनाचा निषेध केला.

कंपनीकडून कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये दुजाभाव केला जातो. कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराची मुदत 3 वर्षांची असते. मात्र, व्यवस्थापन काहीतरी कारणे काढून दीड ते दोन वर्षे वेतनवाढीचा करार जाणीवपूर्वक रखडवत आहे. यापूर्वीचे करारही असेच रखडवून कामगारांना वेठीस धरण्याचे काम झाले आहे. याउलट व्यवस्थापनाच्या वेतनवाढीच्या कराराला एक महिनाही विलंब न करता प्रत्येक वेळी त्यांचा करार केला जातो. नुकतीच जुलै 2023 मध्ये व्यवस्थापनातील कर्मचार्‍यांना दुसर्‍यांदा मोठी वेतनवाढ दिली.

गेल्या 16 महिन्यांपासून कामगारांच्या वेतनवाढीचा करार प्रलंबित असून, त्यासाठी आजवर 21 बैठका झाल्या आहेत, मात्र तरीही कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढला जात नाही. शिवाय, कामगारांचे तीन पगार व इतर देणी थकीत असताना व्यवस्थापनातील अधिकार्‍यांचे एकाच दिवशी दोन पगार करून कामगारांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे कामगार संतापले असल्याचे आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले.

कामगारांमध्ये अफवा पसरवण्याचे प्रयत्न

कामगारामध्ये अफवा पसरवून फूट पाडण्याचे कटकारस्थान सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये एकजूट आहे. एक कामगार कामावर, तर सर्व कामगार कामावर असतील आणि एक कामगार बाहेर, तर सर्व कामगार बाहेर असतील, असे कामगार संघटनेचे सूत्र आहे. त्यामुळे कोणीही कामगारांमध्ये अफवा पसरवण्याचे काम करू नये, असे आवाहन आयएमडी कामगार समन्वय संघाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

 

Back to top button