Nashik News : नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ; पहिल्याच दिवशी ७३ सभासदांनी घेतले १९४ अर्ज | पुढारी

Nashik News : नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ; पहिल्याच दिवशी ७३ सभासदांनी घेतले १९४ अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील सभासद व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला आहे. बँकेच्या २१ जागांसाठी दि. २४ डिसेंबरला मतदान, तर दि. २५ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) बँकेच्या सातपूर येथील प्रशासकीय कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट करण्यात आले. अधिकृतरीत्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच पहिल्याच दिवशी ७३ सभासदांनी १९४ अर्ज विकत घेतले.

शहर व जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून नामको बँकेचा लौकिक आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक ही चुरशीची होत असल्याने या निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर कोणकोणते पॅनल येतात, याकडे विशेष लक्ष लागले आहे. प्रत्यक्षात नामको बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती दि. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, वैध नामनिर्देशन पत्रांची अंतिम यादी ५ डिसेंबर रोजी प्रकाशित होईल. अर्ज माघारीची मुदत दि. ६ ते ११ डिसेंबर असून, दि. १२ डिसेंबरला चिन्हवाटप व चिन्हांसह अंतिम यादी प्रसिद्ध होईल. सर्व २१ जागांसाठी दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. दि. २५ व २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी करण्यात येईल. दि. २७ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर होणार आहे. मतदानाचे स्थळ व मतमोजणीचे स्थळ गरज भासल्यास स्वतंत्ररीत्या जाहीर होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

निवडणुकीसाठी मनीषा खैरनार, राजीव इप्पर, अरुण ढोमसे कार्यरत आहेत. सर्वसाधारण सभेप्रसंगी बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, दिगंबर गिते, गजानन शेलार, संतोष मंडलेचा, ॲड. अमृत पिपाडा आदी उपस्थित होते. दरम्यान, २०१४ ते २०१९ या प्रशासकीय काळानंतर झालेल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वसंत गिते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचा २१/० अशा फरकाने विजय झाला होता.

नीलेश जाजू यांचा अर्ज दाखल

पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि. २४) सर्वसाधारण गटातून नीलेश चंद्रकांत जाजू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवारपासून निवडणूक प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. १९४ अर्जांची विक्री झाल्याने, शनिवारपासून अर्ज दाखल करण्यास आणखी वेग येऊ शकतो.

भेटीगाठींना वेग

प्रशासकाच्या नेमणुकीमुळे नामको बँकेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ती सुधारण्यासोबतच बँकेला स्थिरस्थावर करण्याचे मोठे आव्हान त्यावेळी सत्तारूढ गटासमोर होते. त्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून विद्यमान पदाधिकार्‍यांनी सभासदांची विश्वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न केला. याचाच प्रचार सत्तारूढ गटाकडून केला जात आहे. तर इतर गटांकडून भेटीगाठींवर जोर दिला जात आहे.

अशा आहेत २१ जागा

अनुसूचित जाती जमाती – १

महिला – २

सर्वसाधारण – १८

एकूण – २१

हेही वाचा :

Back to top button