कोणाचा तरी व्हिडीओ तोडमोड करून त्यामधील काही वाक्ये म्हणजे अर्थात विचार कट करून तो व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकार आता जुने झाले आहेत. आपण सर्वजण त्याला सरावलेलो आहोत. त्यानंतर आला फोटो मॉर्फ करण्याचा प्रकार म्हणजे कृती करणारा वेगळाच असतो आणि त्याच्या चेहर्यावर दुसर्या माणसाचा फोटो असा लावला जातो की, जणू काही त्या माणसाने ती कृती केलेली आहे. असे हे तंत्रज्ञान एकदा सर्वत्र उपलब्ध झाले की, राजकारणामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी याचा वापर सुरू झाला. आता त्या पुढील एक नवीन तंत्रज्ञान आले आहे आणि ते म्हणजे डीपफेक तंत्रज्ञान.
कोणतेही तंत्रज्ञान मानवी जीवनात जेव्हा प्रवेश करते तेव्हा त्याचा उद्देश मानवतेचे भले करण्याचा असतो. परंतु, सर्वच प्रकारांचे आणि सर्वच तंत्रज्ञानाचे गुन्हेगारीकरण झाल्यापासून तंत्रज्ञान गुन्हे करण्यासाठी वापरले जात आहे आणि गुन्हे करणारे लोक तंत्रज्ञानाच्या पुढे असतात, हे आपण नेहमी पाहतो. म्हणजे, समजा तुम्ही जागोजागी सीसीटीव्ही लावले, तर चोरांच्या हे लक्षात येते की, इथे सीसीटीव्ही लावलेले आहेत. आपण चोरी करायला गेलो, तर पकडले जाऊ, हे त्यांना माहीत असते. मग, यावर त्यांनी उपाय काढला. पहिला उपाय हा की, सीसीटीव्हीवरच एखादी टेप लावून टाकायची, तरीपण एखादा छुपा कॅमेरा असेल तर? यापेक्षा सोपे म्हणजे आपणच आपले चेहरे फडक्याने गुंडाळून घ्यायचे. म्हणजे चोर कशी चोरी करत आहेत, किती चोर होते, कशी चोरी केली हे सगळं तुम्हाला कळेल; परंतु त्यांचे चेहरे दिसत नसल्यामुळे चोर पकडले जाणार नाहीत. म्हणजे, या ठिकाणी चोरी पकडली गेली; परंतु चोर पकडले गेले नाहीत. म्हणजे तंत्रज्ञानावर मात करण्याचा प्रकार चोरांनी पण शोधून काढला.
तुम्ही कितीही नवीन तंत्रज्ञान आणा, त्याच्यावर मात करण्याची ताकद चोरांकडे असते. आता उदाहरणार्थ, काही तंत्रज्ञानाचे चमत्कार कसे काम करतात हे आम्हालाही अद्याप कळलेले नाही. महामार्गावर गाड्यांची स्पीड किती आहे, याची नोंद करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असतात. समजा विशिष्ट महामार्गावर 90 चा वेग ठेवण्याची परवानगी असली, तरी क्वचित प्रसंगी तुमची गाडी 90 च्या पुढे जाते आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असेल तिथे पकडले जाता. लगेच तुमची स्पीड किती होती, गाडीचा नंबर काय होता आणि तुमच्या मोबाईलवर दोन हजार रुपये दंड बसण्याचा मेसेज येतो. हे दोन हजार रुपये आज न उद्या कधी भरावेच लागतात.
आता यावर मात करण्यासाठी एक अॅप आले आहे. तुम्ही मोबाईलवर ते डाऊनलोड करून घेतले की, समजा महामार्गावर कुठे सीसीटीव्ही असेल त्याच्या पाच मिनिटे आधीच त्यामधून आवाज येतो, पुढच्या पाचशे मीटर अंतरामध्ये सीसीटीव्ही आहे म्हणून. हे तंत्रज्ञान वापरून सीसीटीव्ही किती अंतरावर आहे तिथे आपली स्पीड कमी करून तो सीसीटीव्ही गेल्याबरोबर पुन्हा तुफानी स्पीडने गाडी पळवणारे महाभाग आहेत.
अशाच पद्धतीने व्यक्तींना, एकमेकांना, बदनाम करण्यासाठी केलेले आविष्कार हे हुबेहूब आणि मूळ व्यक्तीसहीत असतात. म्हणजे उद्या हे वापरून कोणीही, कोणाचीही, काहीही बदनामी करू शकतो. अर्थात, या सगळ्या प्रकारामुळे प्रतिष्ठित व्यक्ती आणि यशस्वी व्यक्ती यांना जगणे अवघड होत जाणार आहे, हे नक्की! एकंदरीतच मॉर्फ केलेले व्हिडीओ या तंत्रज्ञानाला कंटाळले आहेत.