दाजीपूर अभयारण्यातील पर्यटन हंगाम बहरला! | पुढारी

दाजीपूर अभयारण्यातील पर्यटन हंगाम बहरला!

राजेंद्र दा. पाटील

कौलव : जगातील 18 संवेदनशील संरक्षित वनांमध्ये (मेगा बायो डायव्हरसिटी स्पॉट) समाविष्ट असलेल्या दाजीपूर अभयारण्यातील पर्यटन हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. दररोज शेकडो पर्यटक व अभ्यासकांच्या वर्दळीमुळे दाजीपूरच्या पर्यटन हंगामाला बहर आला आहे. वन्यजीव विभाग व स्थानिक परिस्थितीकी समित्यांनी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटन सुकर झाले आहे.

राजर्षी शाहू राजांनी शिकारीसाठी राखीव ठेवलेल्या 19 चौरस किलो मीटरच्या जंगलाचे 1958 मध्ये राज्यातील पहिल्या अभयारण्यात रूपांतर करण्यात आले होते. 1985 मध्ये या अभयारण्याचा 351.85 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तार करण्यात आला होता. हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले असून देशातील अतिसंवेदनशील संरक्षित वनात या अभयारण्याचा समावेश आहे. डौलदार गवा हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य असून सुमारे 1000 गव्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली शेकरू खारही या अभयारण्यात मोठ्या संख्येने आढळते. याशिवाय पट्टेरी वाघाचाही वावर आहे.

दि. 1 नोव्हेंबरपासून अभयारण्यातील पर्यटन हंगाम सुरू झाला असून हा हंगाम आता 31 मे पर्यंत चालणार आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दिवाळीच्या सट्ट्यांची पर्वणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यातच अभयारण्य पर्यटकांनी फुलून गेलेले आहे. दरवर्षी या अभयारण्याला 18 ते 20 हजार पर्यटक भेट देतात. आता पहिल्या पंधरवड्यातच दोन हजार पेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे. पर्यटकांबरोबरच शालेय सहली व निसर्ग अभ्यासक यांचा ओढा या अभयारण्याकडे आहे.

जंगल सफारी सकाळी सहा ते दुपारी अडीच या वेळेत असते. दर मंगळवारी प्रवेश बंद असतो. या अभयारण्यात चाळीस किलोमीटर पर्यत जंगल सफारी करता येते. या सफारी पॉईंटमध्ये प्रामुख्याने ठक्याचा वाडा, लक्ष्मी तलाव, सांबर कोंड, वाघाचे पाणी, मुरडा बांबरकोंकण दर्शन पॉईंट, सावराई सडा येथे पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

वन्यजीव विभागाने पर्यटकांसाठी दाजीपूर येथून सुमारे 30 जिप्सी गाड्यांची सोय केली आहे. त्यासाठी प्रतिगाडी 1800 रुपये आकारले जातात. त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राधानगरी येथून असणार्‍या खासगी गाड्यांना 2500 रुपये आकारले जातात. अभयारण्यात निरीक्षण मनोरे व मचाणांची सोय असून ठक्याचा वाडा येथे तंबू निवासाची सोय आहे. वन्यजीव विभाग व ग्राम परिस्थितीकी समितीमार्फत चहा, नाश्ता व जेवणही उपलब्ध होते. यावर्षीच्या पर्यटन हंगामाला सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदाचा हिवाळी व उन्हाळी पर्यटन हंगाम उल्लेखनीय ठरणार आहे.

काय पाहाल?

ठक्याचावाडा तंबुनिवास, उगवाई देवी मंदिर हसणे देवराई, लक्ष्मी तलाव, फुलपाखरू उद्यान, डॉरमेंटरी, अम्पी थिएटर, फुलपाखरू उद्यानसांबर कोंड, वाघाचे पाणी, मुरडा बांबरकोंकण दर्शन पॉईंट, सावराई सडा.

विपुल जैवविविधता

गवा, पट्टेरी वाघ, अस्वल, सांबर, गेळा, भेकर, रानकुत्रा, डुक्कर, ससा यासह 35 प्रकारचे प्राणी व होला दयाल पोपट यासह 235 प्रकारचे पक्षी, तसेच साग, अंजनी, आंबा, जांभुळ, बेहडा, नाना, उंबर, किंजळ, नरक्या यासह 1800 प्रकारच्या वनस्पती व औषधी वनस्पती, ब्लू टायगर, ब्लू मरमॉन, ग्लॉसी टायगर फुलपाखरांचे विविध प्रकार

Back to top button