इसिसच्या पुणे मोड्युलप्रकरणी सातजणांवर आरोपपत्र दाखल | पुढारी

इसिसच्या पुणे मोड्युलप्रकरणी सातजणांवर आरोपपत्र दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इसिसच्या पुणे मोड्युलशी संबंधित सात दहशतवाद्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

संबंधित बातम्या :

त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), एक्स्लोसिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै महिन्यात पुण्यातील कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी आणि मोहम्मद आमल यांना अटक करण्यात आली होती. कोढव्यातील घरझडती दरम्यान आलम फरार झाला होता. दरम्यान दोघांकडील तपासात त्यांचा बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच त्यांचा राजस्थान येथील चित्तोरगड येथील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

या तपासामध्ये आरोपी हे इसिसचे सदस्य असून त्यांचा लोकांमध्ये दहशत माजविण्याचा तसेच भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याचा उद्देश होता. एनआयएच्या तपासात पुणे मोड्युलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन परदेशात बसून हे दशतवादी कृत्य सुरू असल्याचा कट उघड झाला आहे. भारतात दहशतवादी विचारसरणीचा प्रचाराचे गुंतागुंतीचे नेटवर्क तपासात उघड झाले आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी इसिसचा म्होरक्या खलिफा याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्याचेही समोर आले आहे. याच दरम्यान ते आयईडी बनविण्यात गुंतल्याचे आढळून आले. भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी केल्याचेही आढळून आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांनी आयईडी बनविल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात नुकताच कोंढवा परिसरातून फरार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम ऊर्फ शफिकुर रहमान आलम याला अटक करण्यात आली आहे. त्याचा देखील सहभाग विदेशी दहशतवादी संघटनेचा प्रसार व प्रचार करण्यामध्ये होता. त्याच्यावर देखील आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे.

तपासात समोर आलेल्या महत्त्वाच्या बाबी

  • दहशतवाद्यांकडे आयईडी, पिस्तूल आणि दारुगोळा सापडला.
  • फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) तयार करण्यासाठी पूर्वतयारी.
  • दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन.
  • बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्याची देखील योजना त्यांनी आखली होती.
  • अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी दुर्गम जंगलात लपण्याचा प्लॅन आखला होता.
  • दहशतवादी कृत्यासाठी त्यांना भारतातून तसेच परदेशातून वित्तपुरवठा.

Back to top button