आमदारांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे | पुढारी

आमदारांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असतानाच, मंत्रालय इमारतीच्या मुख्य दरवाजाला काही आमदारांनी घोषणा देत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; अन्यथा एकाही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ देणार नाही, असा इशारा देत 23 आमदारांनी प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांवर तासभर ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत या आमदारांना ताब्यात घेतले.

बुधवारी सकाळी हे आमदार सकाळी 11 वाजता कुलूप आणि साखळीसह मंत्रालयात दाखल झाले. त्यांनी मुख्य दरवाजाला टाळे ठोकत पायर्‍यांवर ठिय्या दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, मकरंद पाटील, सुनील शेळके, सतीश चव्हाण, यशवंत माने, अमोल मिटकरी, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, चेतन तुपे, बाबाजानी दुर्राणी, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे, नीलेश लंके, नितीन पवार, बाबासाहेब पाटील यांचा समावेश होता. अपक्ष आमदार संजय शिंदे, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील हेदेखील आंदोलनात सामील झाले होते. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कोणी आमदार सामील झाले नव्हते. टाळे ठोकणार्‍या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधानभवनाच्या पायर्‍यांवरही निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवरही आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहित पवार, तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, प्रकाश फातर्पेकर व अजय चौधरी यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या.

Back to top button