नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील शिंदे गावात एमडी बनवणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या पाचपैकी एका कामगारास मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. रोहितकुमारकडे केलेल्या चौकशीतून कारखान्यात काम करणान्या पाचही कामगारांना कारखान्यातच 'क्वारंटाईन' केले जात होते. कामगारांना कारखान्याबाहेर पडण्यास मनाई होती. तसेच त्यांना जेवणासह इतर सुविधा कारखान्यात पोहोच केल्या जात होत्या. तर त्यांना दरमहा पंधरा ते वीस हजार रुपये पगार दिला जात असल्याचे समोर आले आहे. (Nashik Drugs Case)
शिंदे गावात कारवाई करीत उद्धस्त केलेल्या एमडी (मॅफेड्रॉन) कारखान्याशी संबंधित शिवाजी शिंदे (४०, रा. नाशिक ) व रोहितकुमार चौधरी (३१, बसई) यांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शिवाजी शिंदे हा एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवायचा तर ५ ऑक्टोबरला केलेल्या कारवाईत अटक केलेल्या जिशान शेख व दिल्लीतून अटक केलेला रोहितकुमार हे दोघे एमडी बनवत असल्याचे उघड झाले आहे. शिंदे गावातील दोन्ही कारखाने ड्रग्जमाफिया ललित पाटील ऊर्फ पानपाटील याचा भाऊ भूषण पानपाटील हा त्याचा मित्र अभिषेक बलकवडे याच्या साथीने चालवत असल्याचेही समोर आले आहे. २०२१ च्या अखेरीस सुरू झालेल्या या कारखान्यात काम करणाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई होती. (Nashik Drugs Case)
भूषणने रोहितकुमार यास एमडी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले, त्यामार्फत इतरही कामगार एमडी तयार करत होते. शिंदे गावातील टेकडीवरील कारखान्याच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्याचाच वापर करण्याच्या सूचना कामगारांना होत्या. कारण हा रस्ता गावाकडे न जाता महामार्गाकडे जातो. कारखान्यात महिन्याला सुमारे २०० किलो माल तयार झाल्यावर अभिषेक ऊर्फ जर्मन बलकवडे याच्यामार्फत मागणी केलेल्या ठिकाणी वितरित होत होता. (Nashik Drugs Case)
जबाबदारी ठरलेली
एमडी प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आता गुन्हेगारांची लिक व त्यांचे काम समोर येत आहे. त्यानुसार ड्रग्जमाफिया ललित पाटील हा मोठ्या प्रमाणात ड्रग्जची ऑर्डर घेत होता. तर भूषण पाटील एमडी बनवत होता. त्यानंतर अभिषेक ऊर्फ जर्मन हा ड्रग्ज वितरण व्यवस्थेत गुंतलेला होता. कारखान्यात शिवाजी शिंदे हा कच्चा माल पुरवित होता. तर जिशान शेख, राहुल पंडित, रोहितकुमार चौधरी, इम्रान शेख व गोलू नामक कामगार कारखान्यात एमडी तयार करीत होते.
हेही वाचा :