लंडन : अनेक देशांच्या रस्त्यांची इतकी चाळण झालेली असते की त्यावरील खड्डे पाहून अनेकांना चंद्रावरील खड्डे आठवत असतात. आपल्या देशातही असे खड्डे पाहून आम्ही जणू चंद्रावरच आहोत असे वाहनचालक म्हणत असतात. मात्र, खुद्द चंद्रावरच आता गुळगुळीत रस्ते बनवण्याची तयारी सुरू आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने त्यासाठीचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
चंद्रावर मानवी वसाहत बनवण्यासाठी सध्या अमेरिकेची 'नासा'ची ही अंतराळ संस्था प्रयत्नशील असताना आता युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या पृष्ठभागावर रस्ते बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या द़ृष्टीने काम सुरू केले आहे. पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले लँडर किंवा रोव्हर यांचे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग व्हावे आणि संशोधनात अडचण येऊ नये, यासाठी चंद्राचा पृष्ठभाग समतल बनवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या योजनेला 'पेव्हर' असे नाव देण्यात आले आहे.
शक्तिशाली लेसरचा वापर करून चंद्राच्या धुळीने भरलेल्या पृष्ठभागाला मजबूत आणि समतल बनवले जाईल. चंद्राच्या मोठ्या भागात खड्डे आणि धूळ असून कोणत्याही मोहिमेसाठी ही बाब आव्हानात्मकच बनत असते. 'अपोलो' मोहिमांमध्येही तेथील धुळीने समस्या निर्माण केली होती. 'अपोलो 17' च्या रोव्हरचे या धुळीने मोठे नुकसान केले होते. आता युरोपियन स्पेस एजन्सीने ठरवले आहे की चंद्रावर मोठी मोहीम आखण्यापूर्वी तेथील पृष्ठभाग लँडिंगच्या द़ृष्टीने समतल बनवावा. त्यासाठी लेसर बीमचा वापर केला जाईल व नंतर ठोस पृष्ठभागाला 'इंटरलॉक' केले जाईल.
त्यामुळे चंद्रावर रस्ते आणि लँडिंग पॅड तयार होतील. जर ते तुटले तर त्यांची नव्याने डागडुजीही करता येईल. टीमचे अनुमान आहे की 100 चौरस मीटरच्या लँडिंग पॅडची जाडी दोन सेंटीमीटर असेल व हा पॅड 115 दिवसांमध्ये तयार होईल. या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीची दालनेही खुली करण्यात आली आहेत. चंद्रावर असे प्लॅटफॉर्म बनवल्यानंतर संशोधनाचे काम सोपे होईल असे या स्पेस एजन्सीला वाटते.