वादळात कोसळलेल्या झाडापासून बनवली शाई | पुढारी

वादळात कोसळलेल्या झाडापासून बनवली शाई

लंडन : ब्रिटनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील बॉटनिक गार्डनमध्ये ‘सर आयझॅक न्यूटन’ नावाचा एक वृक्ष होता. याच सफरचंदाच्या झाडाच्या ‘पूर्वज’ असलेल्या एका झाडाने न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधण्यासाठी प्रेरणा दिली होती असे म्हटले जाते. गेल्यावर्षी ‘युनिस’ वादळात हे झाड उन्मळून पडले. आता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील एक कलाकार नाबिल अली यांनी या झाडाच्या सालींचा वापर करून शाई तयार केली आहे. या शाईचा वापर करून त्यांनी 68 मॉडेल सफरचंदांना रंगवले.

सन 1660 च्या दशकात लिंकनशायरच्या ग्रँथमजवळील वूलस्थॉर्प मॅनोरच्या परसात असलेल्या बागेत एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना झाडावरून खाली गळून पडलेल्या सफरचंदाने न्यूटन यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीविषयी विचार करण्याची प्रेरणा दिली होती. याच झाडाचा वंशज असल्याचे मानले जाणारे एक झाड केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या बॉटनिक गार्डनमध्ये होते. हे ‘क्लोन्ड’ झाड बॉटनिक गार्डनमध्ये 1954 मध्ये लावण्यात आले होते. ते केम्ब्रिजमध्ये सर्वांचे आवडते झाड होते.

गेल्यावर्षी वादळात ते कोसळल्याने अनेकांना अर्थातच वाईट वाटले. या झाडाचा नव्या सृजनासाठी वापर करण्याचे अली यांनी ठरवले. त्यांनी या झाडाच्या सालींपासून गडद सोनेरी, पिवळसर रंगाची शाई किंवा रंग बनवला. त्यांनी त्याला ‘न्यूटन्स गोल्ड’ असे नाव दिले. हे झाड केम्ब्रिजमध्ये 68 वर्षे जिवंत होते. त्याचे प्रतीक म्हणून 68 मॉडेल सफरचंदांना रंगवण्यासाठी त्यांनी या शाईचा वापर केला.

Back to top button