वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; येथे दरवर्षी होणाऱ्या जगदंबामाता शारदीय नवरात्र उत्सवास येत्या रविवार (दि.१५)पासून सुरुवात होत आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टने दिली. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वणीचे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक होणार आहे. तसेच गावातील सार्वजनिक उत्सव मंडळे, बसस्थानक आदी ठिकाणी बंदोबस्त ठेवणार असल्याचे बोडखे यांनी सांगितले. (Navratri 2023)
नवरात्रोत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विश्वस्त, सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणीचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानूबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागीरदार प्रयत्नशील आहेत. (Navratri 2023)
या आहेत सोयीसूविधा
दरवर्षी जगदंबादेवी मंदिरासमोर सुमारे दीड हजार महिला भाविक घटी बसतात. घटी बसणाऱ्या महिलांसाठी वॉटरप्रूफ सभामंडप टाकला आहे. मंदिराशेजारी सुस्थितीत निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मंदिर परिसर ट्रस्ट व ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला आहे. मंदिराशेजारील तलाव स्वच्छ केले आहेत. भाविकांना स्नानासाठी तलावाच्या बाजूलाच जलवाहिनीद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. भाविक व घटी बसणाऱ्या भाविकांसाठी अॅक्वागार्डद्वारे मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर, सभामंडप, मंदिरामागील भाग येथे ३६ कॅमेरे बसविले आहेत. नवरात्रोत्सवात मंदिर व गावांत २४ तास वीजपुरवठा सुरळीतसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ट्रस्टने कळविले आहे. घटी बसणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भाविकांना मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा ;