घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी! पुण्यातील स्थिती | पुढारी

घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी! पुण्यातील स्थिती

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने परिसरात कचरा संकलनासाठी स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या संस्थेच्या कामगारांना नागरिकांना दर महिन्याला ७० ते ८० रुपये द्यावे लागत असून, कचरा संकलनात सातत्य नसल्याने नागरिक रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, काही हॉटेलचालक देखील रात्री रस्त्यांवर कचरा टाकत आहेत.

शिवशंभोनगर गल्ली ३ अ, गोकुळनगर चौक, राजीव गांधीनगर, यशवंत विहार, केदारेश्वर पाण्याची टाकी, कात्रज भाजी मंडई, संतोषनगर, कात्रज घाट रस्ता अशा विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी व जांभूळवाडी या गावांत देखील रस्त्याच्या कडेला सर्रास कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, आरोग्य निरीक्षक यांच्या मदतीने या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दंड आकारला जातात. जनजागृती उपक्रम राबवले जातात. मात्र, काही नागरिकांवर याचा परिणाम होत नाही. सजग पुणेकर नागरिक म्हणून स्वच्छतेबाबत स्वतः जागृत होणे गरजेचे आहे. त्याच वेळी ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे अभियान यशस्वी होईल, अशी भावना जाणकार व्यक्त करीत आहेत.

घंटागाडीचा वेळच नाही

घंटागाडीची ठराविक वेळ ठरलेली नाही. हे कर्मचारी दिवसभरात कधीही कचरा संकलनासाठी येतात. अनेक वेळा तीन ते चार दिवस घंटागाडी येत नसल्याने घरात कचऱ्याची दुर्गंधी सुटते. तसेच कामाला गेल्यावर अनेक नागरिकांना घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही. यामुळे परिसरातील रस्त्यावर कचरा टाकला जात असून, त्याचा कचरा संकलन करणारे कर्मचारी जबाबदार असल्याचे संतोषनगर येथील महिलांनी सांगितले.

हेही वाचा

Pune News : पुण्यात तब्बल आठ इमारतींवर हातोडा

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार; राऊतांचा भुसे, भुजबळांवर निशाणा

Ajit Pawar : पुणे जिल्हा बँकेत युपीआय सेवा सुरु; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

Back to top button