जो जास्त भाव देईल, तोच ऊस नेईल..! | पुढारी

जो जास्त भाव देईल, तोच ऊस नेईल..!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  उसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर जिल्ह्यात दसर्‍यापासून कारखान्यांची धुराडी पेटण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटणार आहे. शिवाय शासनाकडून चार्‍यासाठी 2700 रुपये टन भावाने वाढ्यांसह ऊसखरेदीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे गाळपासाठी उसाची उपलब्धता घटणार आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गाळपाला 40 लाख टनांचा फटका बसण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. शिवाय शेतकर्‍यांनी दोन-दोन कारखान्यांकडे नोंदणी केल्याने ‘जो जास्त भाव देईल, तोच ऊस नेईल,’ अशी परिस्थिती उद्भवण्याचीही शक्यता आहे. परिणामी यंदाचे गाळप कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या वर्षी जिल्ह्यातील सहकारी 13 व खासगी 10 अशा 23 कारखान्यांनी 1 कोटी 24 लाख 95 हजार टन उसाचे गाळप केले होते. यापासून 1 लाख 20 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. त्या वेळी साधारणतः 1 लाख 70 हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र होते. गेल्या वर्षी पाऊसही चांगला झाल्याने उत्पादन चांगले निघाले होते. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. यंदा पावसाळ्यातच चार्‍याची टंचाई जाणवली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील दाहकता लक्षात घेता यंदा उसाची चार्‍यासाठीही मागणी वाढणार आहे. तसेच रसवंती, ज्यांच्याकडे पाणी आहे तेथे बेण्यासाठी उसाला मागणी असेल. असे अंदाजित 25 टक्क्यांप्रमाणे 37 हजार हेक्टर क्षेत्र याप्रमाणे तोडले जाईल. यातून गाळपासाठी अंदाजे 1 लाख 11 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाकडून व्यक्त केला जात आहे.

40 ते 50 लाख टनांचा फटका
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. साखर भरण्याची वेळ असतानाच पाणी न मिळाल्याने वजन आणि साखर उतार्‍यावरही परिणाम जाणवणार आहे. गतवर्षी सव्वा कोटी टन गाळप झाले होते. या वर्षी उपलब्ध 1 लाख 11 हजार हेक्टर क्षेत्रातून हेक्टरी 60 टनांप्रमाणे उत्पादित झालेल्या एकूण 66 लाख टन उसाचेच गाळप होऊ शकेल. त्यातून 58 ते 62 लाख क्विंटलची साखर निर्मिती होणार असल्याचा अंदाजही प्रशासनाकडून वर्तविला जात आहे.

कारखान्यांचा बाहेरच्या उसावर डोळा
जिल्ह्यात 1 लाख 48 हजार हेक्टर ऊस उभा असला, तरी यातून गाळपासाठी क्षेत्र कमी आहे. त्यातही काही शेतकर्‍यांनी दोन-दोन कारखान्यांकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे ऐन वेळी नोंदणी केलेला ऊस कागदावरच राहील आणि आधी कापून नेईल, त्याचा होईल. परिणामी, अनेक कारखान्यांना बाहेरून उसाची टंचाई सोसावी लागण्याची शक्यता असून, त्यासाठी आतापासूनच कारखाना व्यवस्थापन आपल्या शेजारील पाच जिल्ह्यांतील उसावर नजर ठेवून असल्याचे समजते.

यंदा उपलब्ध ऊस
यंदा जिल्ह्यात आडसाली 27908, पूर्व हंगामी 21273, सुरू 41199 आणि खोडवा 58 हजार असे एकूण 1 लाख 48 हजार 388 हेक्टर उसाचे क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. मात्र, चारा, रसवंती, बेण्याला यातील 25 टक्के ऊस जाणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

3500 च्या पुढे भाव देणार्‍यालाच ऊस द्या : औताडे
या वर्षी जो कारखाना 3500 रुपयांच्या पुढे पहिले पेमेंट करील, त्यालाच तोड द्यावी. कारखान्यांकडून चलाखी करून रिकव्हरी चोरी होते. तोडणी खर्च जास्त लावला जातो. वाहतूक खर्चातही गोंधळ आहे. त्यामुळे आम्ही ‘एफआरपी’ला बांधील नसून, साखरेच्या दराचा विचार करताना यंदा 3500-3700 रुपये टन भाव काढावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.

चार्‍याला प्रतिटन 2700 रुपये भाव
शासनाने उन्हाळ्यात चाराटंचाईवर मात करण्यासाठी ऊसखरेदीचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार वाढ्यांसह उसाला प्रतिटन 2700 रुपये दर देण्याच्या शासनाच्या हालचाली असल्याचे समजते. त्यामुळे शेतकरी आपला ऊस चार्‍यासाठी देण्यावरच भर देण्याची शक्यता आहे.

 

Back to top button