Pune News : विवाहितेचे मुंडके धडावेगळे करणार्‍या पतीसह सासर्‍याला जन्मठेप | पुढारी

Pune News : विवाहितेचे मुंडके धडावेगळे करणार्‍या पतीसह सासर्‍याला जन्मठेप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घर बांधण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोके धडावेगळे करणार्‍या पती कांताराम सत्यवान ढगे (वय 27) व सासरा सत्यवान बबन ढगे (वय 57) यांना न्यायालयाने जन्मठेप व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासू बायसाबाई ढगे (वय 40) हिस 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला आहे.

दिपाली कांताराम ढगे (वय 24) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. 10 एप्रिल 2013 रोजी ही घटना घडली. दंडाच्या रक्कमेपैकी 1 लाख रुपये मयत विवाहितेच्या आई, वडिलांना द्यावेत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणातील आरोपींनी दिपाली हिच्याकडे घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन ये. नाहीतर आई-वडिलांना घर बांधून द्यायला सांग, असा तगादा सातत्याने लावला. तिचा छळ करत मारहाण केली. पैसे आणि घर बांधून दिले नाही म्हणून आरोपींनी तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे डोके धडावेगळे करून अज्ञात स्थळी टाकून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी 15 साक्षीदार तपासले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. पाठक यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा न्यायालयात पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे, सत्र न्यायालयात पैरवी अंमलदार सहायक पोलिस फौजदार विद्याधर निचित, कोर्ट पैरवी हवालदार एस. बी. भागवत यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

हेही वाचा

Navaratri-Nine forms of Goddess Durga : देवीची ९ रुपे कोणती?

घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी! पुण्यातील स्थिती

Pune Sex Racket : पुण्यात ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

Back to top button