धुळे : अवैध गौणखनिज उत्खनन, साठवणुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; 2 कोटींचा दंड वसुल | पुढारी

धुळे : अवैध गौणखनिज उत्खनन, साठवणुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; 2 कोटींचा दंड वसुल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठवणूकीविरोधात महसूल विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील अवैध गौणखजिन वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांकडून २ कोटी ३ लाखाचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

संबधित बातम्या 

धुळे जिल्ह्यात याबाबत जानेवारी २०२३ ते माहे सप्टेंबर २०२३ या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठवणूक करित असताना वाळूचे १७१, मुरुमाचे ३४, मातीचे ५ व दगडाचे १२ वाहने असे एकूण २२२ इतकी वाहने पकडण्यात आली आहेत. या पकडलेल्या वाहन मालकांकडून २ कोटी ३ लाख रूपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. दंड न भरलेल्या एकुण ७ वाहनांचा तहसील कार्यालयामार्फत लिलाव करुन त्यातून दंडाची रक्कम ७ लाख ४ हजार ७५० वसुल करुन ती शासन जमा करण्यात आली आहे. तसेच अवैध गौणखनिज वाहतुक करीत असताना पकडलेल्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरणेस टाळाटाळ केली असता सदर वाहन मालकाच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.

अवैध गौणखनिज वाहतूक करित असताना पकडलेली वाहने अवैधरित्या पळवून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा वाहनचालक धारकांविरूध्द विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. अवैध गौण खनिजाची वाहतुक प्रभावीपणे थांबविणेकामी जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयाअंतर्गत २४ तास पथके कार्यरत असून जिल्ह्याच्या मुख्यालयीदेखील जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यान्वीत केली आहे. जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी नेमलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ४ वेळा जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा हल्लेखोरांवर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे सोपविलेले काम उत्तमरित्या करीत असुन अवैध गौणखनिज वाहतुक करणा-या वाहनावर कारवाई सुरु आहे. महसुल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक ‘परिवहन विभाग यांचेमार्फत देखील अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. अवैध गौणखनिज वाहतुक करणा-या सराईत गुंड व गुन्हेगारी प्रवृत्ती असणा-या व्यक्तींवर महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक (MPDA) कायदा अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस विभाग कार्यवाही करीत आहे. यापुढेही अवैध गौणखनिज वाहतुकबाबत कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच नवीन वाळु धोरण २०२३ अंतर्गत धुळे जिल्ह्यात शासकीय वाळु डेपो निर्माण करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button