रूकडी-कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रेतील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

रूकडी-कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रेतील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

रूकडी : पुढारी वृत्तसेवा : रूकडीतील नियोजित आंदोलन मोडीत काढत पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तर रूकडी ग्रामस्थांनी बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. पंचक्रोशीतील रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी रूकडी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा आंदोलन अॅड. अमित कुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती.

याबाबत विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा निवेदने व आंदोलन झाली आहेत. परंतु रेल्वेने याकडे कानाडोळा केला आहे. वास्तविक कोरोना काळात रेल्वे पॅसेंजर तसेच एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केले. अलिकडे रुकडी, येथील एक्सप्रेस गाडयाचा थांबा बंद करण्यात आला. यामुळे मिरज तसेच कोल्हापूरकडे शिक्षण, नोकरी तसेच कामधंदयासाठी जाणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी नागरिकांची आर्थिक, मानसिक कुचंबणा झाली. त्याचबरोबर ठिकठिकाणी झालेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे निकृष्ट काम व गैरसोयीमुळे नागरिकांवर मनस्तापाची वेळ आली आहे.

या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुर्दाड रेल्वे प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात प्रवासी नागरिकांच्या वतीने कोल्हापूर रेल्वे प्रशासनाला’ आत्मक्लेश पदयात्रा ‘ काढून निवेदन देण्यात येणार होते. परंतु, सदर आंदोलन चिरडण्याच्या मनसुब्याने रेल्वे पोलिसांनी सकाळी ८ पासून मोठा पोलीस फौजफाटा दाखल केला होता. यावेळी पोलिसांनी दहशत निर्माण करत रेल्वे स्टेशनवर जमणाऱ्या आंदोलकांना हाकलून काढले. पोलिसांची अरेरावी व दहशतीने प्रवासी नागरिक घाबरले. तर काहीने खासगी वाहने व बसने जाणे पसंत केले.

यावेळी जमलेल्या काही आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी घेराव घालून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. स्टेशनवरील मोठा पोलीस फौजफाटा पाहून काहीकाळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांने आत्मक्लेश पदयात्रेतील आंदोलकांना रेल्वे भुयारी मार्गाजवळ ताब्यात घेतले. यामध्ये अमितकुमार भोसले, कुमार चव्हाण, प्रशांत गवळी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रूकडी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा 

Back to top button