Nashik News : कवडीमोल दरामुळे संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर ओतले टोमॅटो | पुढारी

Nashik News : कवडीमोल दरामुळे संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर ओतले टोमॅटो

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

टोमॅटोला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संतप्त शेतकर्‍यांनी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासमोरील नाशिक-कळवण रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (Nashik News)

कांद्याला सध्या समाधानकारक दर मिळत नसताना टोमॅटोचीही तीच गत झाली आहे. टोमॅटो पिकासाठी शेतकर्‍यांना एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च लाखात मात्र उत्पन्न रुपयात अशी सध्या अवस्था असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दोन दिवसांपासून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोचे दर दिवसेंदिवस कोसळत आले आहेत. सायंकाळी ४.३० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात टोमॅटो आवक झाली. मात्र खरेदीदार नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासमोरील रस्त्यावर टोमॅटो ओतून शासनाचा निषेध केला. आंदोलनाची माहिती मिळताच दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजार समितीचे उपसभापती कैलास मवाळ यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढत व्यवहार सुरळीत सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. बाजार आवारात शेतकरी-व्यापारी यांच्याशी चर्चा करत खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती वसंत थेटे, वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, राकेश शिंदे, प्रभाकर जाधव, चिंटू पाटील, सचिन मेधणे, विठ्ठलराव अपसुंदे, तौसिफ मनियार आदी शेतकरी उपस्थित होते. (Nashik News)

हेही वाचा :

Back to top button