लवंगी मिरची : राजकीय दांडिया.. | पुढारी

लवंगी मिरची : राजकीय दांडिया..

राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे तसा मोठाच विषय असतो, नाही का मित्रा? म्हणजे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जनतेच्या भल्याचा काहीतरी विचार करून निर्णय जाहीर केले जातात, म्हणून लोकांचे पण लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले असते. होणार, होणार म्हणून गाजत असलेला मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार, हे मात्र कोणालाच माहीत नाही.

हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक आमदारांनी शपथविधीसाठी शिवलेले कोटसुद्धा जुने झाले; पण मंत्रिमंडळ विस्तार काय झाला नाही; पण तू म्हणालास तसे मंत्रिमंडळाच्या बैठकीला झाडून सगळे मंत्री, मुख्यमंत्री आणि विशेषत: दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असणे अत्यंत आवश्यक आहे. परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील दादा उपमुख्यमंत्री यांनी दांडी मारली आणि त्यावरून मंत्रिमंडळ विस्ताराचा दांडिया राज्यात सुरू झाला.

हे बघ, जनतेचे कधीच काही बिघडत नाही. जनता ‘मुकी, बिचारी कोणीही हाका’ या न्यायाने चालत असते. आमदारांना बर्‍यापैकी फरक पडतो. म्हणजे होते काय, की पुढच्या विधानसभेच्या इलेक्शनला सामोरे जाण्यापूर्वी मंत्री म्हणून आपल्या मतदारसंघांमध्ये चांगला जम बसवता येतो, शिवाय बर्‍यापैकी निधी पण वळवायची सोय होते, त्यासाठी सगळ्यांना मंत्रिपद हवे असते.

संबंधित बातम्या

पण मी काय म्हणतो, समजा नसेल एखाद्या जिल्ह्याला मंत्री, तर काय बिघडते? प्रशासन तर आपले नेहमीच्या पद्धतीने सुरू असते. जिल्हाधिकारी असतात, इतर सदस्य असतात इतर आमदार असतात मग मंत्रिपद नेमके कशासाठी हवे असते? आणि मग याला दांडिया असे का म्हणत असतील? कारण माझ्या माहितीप्रमाणे गरबा किंवा दांडिया हे गुजराती खेळ आहेत. ते आता महाराष्ट्रात खेळले जाऊ लागले आहेत हे नक्की. परंतु, राजकारणात याला दांडिया का म्हणत असतील? तुला माहीत असेल तर मला सांग.

अरे सोपे आहे. दांडिया खेळताना दोन्ही हातांमध्ये टिपर्‍या घेतलेल्या असतात. दांडिया खेळणारे लोक गोलाकारात फिरत दोन टिपर्‍या घेऊन खेळत असतात. डाव्या बाजूच्या खेळाडूच्या टिपरीवर टिचकी मारली की गिरकी घ्यायची आणि पुढील उजव्या बाजूच्या खेळणार्‍याच्या टिपरीवर टिचकी मारायची. गरबा खेळणे याचा अर्थ एवढाच की आपल्यासोबत खेळणार्‍यांच्या टिपर्‍यांवर टिचकी मारणे आणि गिरक्या घेत पुढे सरकणे.

बरोबर आहे, तू म्हणतोस ते. राज्याच्या राजकारणात दुसरे काय असतेच काय? पण या सगळ्यामुळे जनतेची पण करमणूक होत असते, हे तू विसरू नकोस. शिवाय महाराष्ट्र राज्यात कोणताही पक्ष असला तरी, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही आपले निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावे- यावे लागते, कारण तशी परंपराच निर्माण झाली आहे.

ते असू दे. ते तर स्वातंत्र्यापासून तसेच सुरू आहे; पण येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तयारीसाठी फक्त गुजराती गरबा नाही, तर आपला अस्सल मराठी गोंधळ पण होणार आहे, तमाशा पण होणार आहे, फड पण रंगणार आहे आणि चक्क तालमीतील कुस्त्या पण होणार आहेत. इथून पुढे येणार्‍या काळात कुणी कुणाला कात्रजचा घाट दाखवला, कुणी कुणाला धोबीपछाड दिले, कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला, ही चर्चा दिवसेंदिवस रंगत आणणार आहे हे लिहून घे.

Back to top button