देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश; आरोपीला सायबर पोलिसांकडून बेड्या

देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश; आरोपीला सायबर पोलिसांकडून बेड्या
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवांच्या नावाने बनावट इमेल आयडी तयार करत फडणवीस यांच्या बनावट सहीने सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे बनावट आदेश जारी करणाऱ्या ४० वर्षीय कंत्राटदाराला राज्य सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. मोहम्मद इलियास याकूब मोमीन असे आरोपीचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील मिरजचा रहिवासी आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करुन ही कारवाई केली आहे. महाले यांच्या तक्रारीनुसार, यातील आरोपी मोमीन याने त्यांच्या नावाने बनावट इमेल आयडी तयार केला. त्यानंतर फडणवीस यांच्या बनावट सह्या करुन त्याने बनावट दस्तएेवज तयार करुन शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भादंवि कलम ४६५, ४६७, ४६८, ४६९.४७१,४१९, ४२० आणि १२० (ब) यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करुन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेश पुकळे यांच्या पथकाने तपास सुरु केला.

तपासादरम्यान, मिरजेतील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलनीमध्ये रहात असलेल्या खाजगी कंत्राटदार मोमीन याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला. मिरज पोलिसांच्या मदतीने सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून मोमीन याने आर्थिक फायद्यासाठी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या ऊर्जा खात्याचाही कार्यभार आहे. २३ जुलैला त्याने सरकारी अधिकारी, सहायक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता दर्जाच्या सहा जणांना बदल्यांची बनावट कागदपत्रे पाठविली. हा मेल महावितरणच्या सीएमडींनाही पाठवण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news