Anil Patil : नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अनिल पाटील, डॉ. गावितांचे समर्थक दुखावले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा ; महाराष्ट्र शासनाने अचानक पालकमंत्री पदाचे फेरबदल घडवले. यामुळे नंदुरबार येथील महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री अनिल पाटील यांना सोपविण्यात आले. या फेरबदलामुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या समर्थक नाराज झाले आहेत.
डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेचे आमदार आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांना आदिवासी विकास मंत्री पद मिळाले त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पद देखील पर्यायाने त्यांच्याकडे आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेला राष्ट्रवादीचा अजितदादा गट या तीन पक्षात सत्ता पदांचा समतोल साधण्यासाठी सध्या कसरत चालली आहे. त्या परिणामातून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांना प्राप्त झाले. अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता एक महिन्यापूर्वीपासून वर्तवली जात होती. अजित दादा यांचा झालेला नंदुरबार दौरा आणि पाठोपाठ दोन वेळेस अनिल पाटील यांचे झालेले दौरे त्या चर्चेला कारणीभूत होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी गडचिरोली चे पालकमंत्री पद भूषविले आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या यादीनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा :