नाशिकमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात | पुढारी

नाशिकमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा, ‘सरकार कि आमद मरहबा, दिलदार कि आमद मरहबा’ ‘चारो तरफ नूर छाया, आका का मिलाद आया’ असा जयघोष करत नाशिक शहर व परिसरात ईद-ए-मिलादुन्नबी जल्लोषात साजरी झाली. यानिमित्ताने जुने नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.२९) मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात हजारो मुस्लिम बांधव धार्मिक पोशाखात मिरवणुकीत सामील झाले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत झाले तसेच गुलाबजल व फुलांचा वर्षाव करण्यात आला. मुस्लिम बांधव डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करून सामील झाले होते, यंदाची मिरवणूक गर्दीचा उच्‍चांक मोडणारी ठरली.

संबधित बातम्या :

सुरुवातीला खतीब-ए-शहर व धर्मगुरूंचा पुष्पहार देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. अशरफी यांनी देश व देशवासियांसाठी विशेष प्रार्थना केली. यावेळी नायब काजी-ए-शहर एजाजुद्दीन सय्यद, सैय्यद मीर मुख्तार अशरफी, नुरी अकॅडमीचे वसीम पीरजादा, मौलाना मेहबूब आलम उपस्थित होते. तसेच खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आदी शूभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर जहांगीर मशीद चौक मंडई येथून सुमारे ४ वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली. दुरुद शरीफ, नात-ए-पाक, मनकबत व सलातो सलामचे वाचन करीत मिरवणूक मार्गस्थ झाली. तसेच मौलाना जफर खान यांनी ईद-ए-मिलादुन्नबी बद्दल माहिती दिली. मिरवणूक वझरे रोड, बागवानपुरा चौक, कथडा, शिवाजी चौक, अजमेरा मशीद, मीरा दातार, आझाद चौक, पठाणपुरा, बुधवार पेठ, आदमशाह दर्गा, काजीपुरा पोलीस चौकी, मुल्तानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, दखनीपुरा, महात्मा फुले मार्केट, माजी साहेबा दर्गा, खडकाळी पोलीस चौकी, शहीद अब्दुल हमीद चौक, दूध बाजार, पिंजारघाटा मार्गे रात्री सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत सय्यद सादिक शाह हुसैनी यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहोचली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करीत मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

मिरवणूक मार्गासह संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ठिकठिकाणी मक्का शरीफ, मदिना शरीफ, इमाम हुसैन यांचा रौजा, बगदाद शरीफ, अजमेर शरीफ, किछौछा शरीफ तसेच बरेली शरीफ येथील आलाहजरत इमाम अहमद रजा खान व नाशिक मधील बडी दर्गा शरीफची छायाचित्र असलेले होर्डिंग्स लावण्यात आले होते. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.

घरोघरी फातेहा पठण

मिरवणुकीच्या आदल्या दिवशी (दि.२८) रोजी अर्थात ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी बडी दर्गा, मध्यवर्ती शाही मशीद, जहांगीर मशीद, मिनारा मशीद, अजमेरा मशीद आदींसह सर्व मशिदी व धार्मिक स्थळांसह घरांमध्ये पवित्र कुराण वाचन करून फातेहा पठण करण्यात आले. घरांमध्ये महिलांनी दुध व खवा पासून खीर व त्यासोबत गव्हाच्या आत्याची पुरी तयार करून त्यावर फातेहा देत एकमेकांना वाटप केली.

मदरसा नूरियाच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले

घास बाजारातील मदरसा नूरिया फैजान-ए-सादिकच्या लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी हातात झेंडे व पारंपरिक पोशाख परिधान करून जुलूसमध्ये अतिशय शिस्तीने मार्गस्त होते. दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांची जास्त संख्या असलेली हि शिक्षण संस्था असून त्यांना येथे शिक्षण देण्यात येते अशी माहिती विश्वस्त नाजीम शेख यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button