कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष | पुढारी

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : फुलांची आरास… पारंपरिक वाद्यांचा गजर… लेझीम, फुगड्यांवर महिलांचा फेर… वरुणराजाची अधूनमधून हजेरी… साऊंड सिस्टीमसह नेत्रदीपक विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा जल्लोषी वातावरणात लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी निघाली. मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग गर्दीने व्यापून टाकला होता. आबालवृद्धांसह महिलांचा मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग दिसून आला. रात्री बारापर्यंत सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या तालावर तरुणाई थिरकत होती.

दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यात गणरायाची मनोभावे पूजा झाली. गुरुवारी बाप्पांच्या विसर्जनाचा क्षण आला. जितक्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले होते, तशीच जय्यत तयारी मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी करण्यात आली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानापासून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश या मुख्य व पारंपरिक विसर्जन मार्गावर गणेशमूर्तीचे आगमन सुरू झाले.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

मिरवणुकीत नऊवारी साडी, फेटे आणि एकाच रंगाच्या साड्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी महिलांनी फुगडी, लेझीमचे सादरीकरण करत होत्या. तसेच अनेक मंडळांच्या साऊंड सिस्टीमवरही महिलांनी ठेका धरला. मिरवणुकीत सहभागी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

चांद्रयान मोहिमेने वेधले लक्ष

यंदाच्या मिरवणुकीत अनेक गणेशमूर्ती, तांत्रिक देखावे चांद्रयान मोहिमेवर करण्यात आले होते. तसेच इस्रोच्या संशोधकांना सलाम करणारे अनेक फलकही मिरवणुकीत झळकले.

पारंपरिक वाद्यांचा गजर

गुरुवारी सकाळपासून सहभागी मंडळांसोबत ढोल-ताशा पथके, लेझीम पथके, हलगी, घुमके, मर्दानी कलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात येत होती. दिवसभरात मिरवणूक मार्गावर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता.

मोठ्या मंडळांची सायंकाळी ‘एंट्री’

मिरवणुकीत सहभागी मोठी मंडळे सायंकाळी चारपर्यंत मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली नव्हती. यानंतर मिरजकर तिकटी येथे किरकोळ वाद झाला. पाच वाजण्याच्या सुमारास बिनखांबी गणेश मंदिर येथे शिवाजी पेठ आणि मिरजकर तिकटीकडून आलेल्या मंडळांमध्ये महाद्वार रोडवर ‘एंट्री’साठी चढाओढ सुरू झाली.

वरुण राजाची हजेरी

मिरवणुकीवेळी अधूनमधून वरुण राजाची हजेरी लागत होती. अचानक येणार्‍या पावसापासून संरक्षणासाठी गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे आच्छादनही घालण्यात आले. ढोल-ताशा पथके, लेझीम पथकाच्या कलाकारांचीही पावसामुळे धावपळ उडाली.

चपलांचा खच उचलताना कर्मचारीही हैराण!

गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण मिरवणूक मार्गावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अक्षरशः रात्रभर लोक गर्दीने भरलेल्या रस्त्यावर वार्‍याप्रमाणे झुलताना दिसत होती. त्यात अनेकांना पायातील चप्पल सांभाळणे जिकिरीचे झाले होते. अशा परिस्थितीत आज सकाळी मनपाची स्वच्छता मोहीम सुरू असताना सुमारे पाच डंपरहून अधिक चपलांचा खच सापडला. सकाळपासूनच बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, अंबाबाई मंदिर परिसर, पापाची तिकटी आदी मिरवणूक मार्गावर सहा कर्मचार्‍यांची टीम कार्यरत होती.

Back to top button