Nashik News : नाशिकमध्ये विसर्जनावेळी आठ गणेशभक्तांवर काळाचा घाला | पुढारी

Nashik News : नाशिकमध्ये विसर्जनावेळी आठ गणेशभक्तांवर काळाचा घाला

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यासह शहर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये उत्साहाला गालबोट लागले आहे. शहरातील विविध भागांमध्ये घडलेल्या चार दुर्दैवी घटनांमध्ये आठ गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीपात्रात तीन, वालदे‌वी धरण परिसरात एक, चेहेडी संगमावर दोन, तर अंबडमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या बालकाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला आहे, एकूण श्रींच्या विसर्जन सोहळ्यामध्ये अशा दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबधित बातम्या :

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शाेध सुरू आहे. बुधराम ओमप्रकाश माैर्या (वय २४, रा. कुमावतनगर, मखमलाबाद राेड, पंचवटी), राऊल सत्यनारायण माैर्या (वय १४, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी), साेहन भगवतीप्रसाद साेनकर (वय २८, रा. शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळ, पेठ राेड, पंचवटी) आणि प्रदीपकुमार वर्मा (वय २१, सुदर्शन कॉलनी, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) अशी चाैघा मृतांची नावे असून, विसर्जनावेळी आंघाेळीकरिता जात असताना पाय घसरल्याने ते बुडाले होते. गणपती विसर्जन सुरू असताना सायंकाळी ५ वाजता बुधराम, राऊल, साेहन व साथीदार गणपती विसर्जनासह आंघाेळीसाठी माेदकेश्वर मंदिरासमाेरील गाेदापात्रात उतरले. त्याचवेळी पाण्याच्या खाेलीसह प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती समजताच बचाव पथकाने जीवरक्षक आणि गळाच्या साहाय्याने मृतांचा शाेध घेतला असता शुक्रवारी सकाळी बुधराम, राऊल आणि साेहन यांचे मृतदेह टाळकुटेश्वर मंदिराजवळील वाहत्या पात्रात आढळून आले.

वालदेवी नदीपात्रात तिघांचा मृत्यू

वालदेवी नदीपात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गणेश विसर्जनावेळी घडली. यात दोन महाविद्यालयीन युवकांसह एका विवाहित तरुणाचा समावेश आहे. सिन्नर फाटा (चेहडी) येथील शिव इम्पायर मार्व्हल या इमारतीच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जनाठी प्रसाद सुनील दराडे (18) हा मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे येथील संगमेश्वर येथे गेले होते. यावेळी प्रसाद पाण्याजवळ गेला असता त्याचा पाय घसरला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत असताना रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण वाहून गेले. नदीपात्राचे वाकडे तिकडे वळण, मोठे दगड यांचा मार लागून दोघे जखमी झाले. पाण्यात वाहत येत असल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांनी सहकारी व नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले. रुग्णवाहिका नसल्याने पोलिस वाहनातूनच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रोहित नागरगोजे यास जिल्हा रुग्णालयात, तर प्रसाद दराडे यास बिटको व नंतर सिन्नर फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रसाद हा जेडीसी बिटको महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होता. तर रोहित हा सामनगाव येथील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. दोघेही मित्र होते.

दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे. दुपारी भाविक वडनेर येथे वालदेवीनदी घाटावर गणपती विसर्जन करीत असताना महादेव मंदिर, लहान पुलाजवळ हेमंत कैलास सातपुते (35) हा विवाहित तरुण नदीपात्रात बुडाला. माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांनी अग्निशमक दलाला माहिती दिली असता जवानांनी नदीपात्रात त्याचा शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व रात्र झाल्याने शोध लागू शकला नव्हता.

ट्रॅक्टरखाली चिरडून मुलाचा अंत

परिसरातील चुंचाळे भागात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना रात्री ९ च्या सुमारास विसर्जन मिरवणूक पाहात असताना ट्रॅक्टरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका सहावर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील जखमी झाले आहेत. रुद्र राजू भगत (वय 6) असे या बालकाचे नाव आहे. तर त्याचे वडील राजू भगत (रा. मारुती संकुल. दत्तनगर) हे जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवार पोलिस चौकीच्या हद्दीत चुंचाळे गाव भागात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत राजू भगत यांनी त्यांचा सहावर्षीय मुलगा रुद्रलादेखील मिरवणूक पाहण्यासाठी आणले होते. मिरवणूक सुरू असताना रात्री ९ च्या सुमारास कृष्णा स्वीट्सकडून दातीरनगरकडे जाणाऱ्या उतार रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ४०, एल ३९६३) पुढे जात असताना ट्रॅक्टरची धडक या बाप-लेकाला बसली. त्यातच रुद्र खाली पडल्यावर त्याच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी रुद्र यास मृत घोषित केले. तर रुद्रचे वडील राजू भगत हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड चुंचाळे पोलिस चौकीत ट्रॅक्टरचालक अश्विन शिरसाट याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी झोले करीत आहेत. दरम्यान, मृत रुद्रवर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रुद्र हा परिसरातील एका शाळेत लहान गटात शिकत होता, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निफाडला युवक वाहून गेला

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नवव्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील युवक नेत्रावती नदीच्या पुरात वाहून गेला. त्याचा मृतदेह २४ तासांनंतर चांदोरी व पिंपळगाव अग्निशमन दलाच्या पथकाला आढळून आला. ही घटना बुधवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. नऊ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी शिरवाडे वणी येथील राज उमेश वाघ (20) हा पाचोरे परिसरातील नेत्रावती नदीतीरी गेला होता. त्याला नदीच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने पाय घसरून पडला. यावेळी स्थानिकांनी आरडाओरड केल्याने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन व पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत गळ व बोटीच्या साह्याने युवकाचा शोध घेतला. मात्र, गुरुवारी सकाळी राजचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा :

Back to top button