Nitin Gadkari : वाशिम जिल्ह्यात सिंचनातून शेती, उद्योगाला चालना देणार : नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : वाशिम जिल्ह्यात सिंचनातून शेती, उद्योगाला चालना देणार : नितीन गडकरी

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातून जाणारा पूर्वी एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता आज 228 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाचा कार्यभार पूर्ण झालेला असेल तेव्हा जिल्ह्यात एकूण 10 हजार कोटी रुपयांची राजमार्गाची कामे पूर्ण होतील. जिल्ह्यातून 12 ते 13 नद्यांचा उगम आहे. ते पाणी बाहेर जिल्ह्यात वाहून जाते. त्यामुळे सिंचन क्षेत्र कमी आहे. मात्र, जिल्ह्यात व्हीजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे. त्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय आणि उद्योगाला चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

आज (दि. 29) वाशिम येथील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित कार्यक्रमात अकोला ते वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या चारपदरी महामार्गाच्या कामावर 3694 कोटी 51 लक्ष रुपये खर्च करण्यात आले.या राष्ट्रीय महामार्गाचे राष्ट्रार्पण यावेळी गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, हिंगोलीचे आमदार तानाजी मुरकुटे, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार अॅड. विजयराव जाधव, पुरुषोत्तम राजगुरू जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे उपस्थित होते.

शेलुबाजार वळण रस्त्याचे लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, या रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेची कामे करण्यात आली आहेत. आज विदर्भाचे चित्र बदलत आहे. बरीच विकास कामे होत आहे. गेल्या काही वर्षात नापिकीमुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील शेतकऱ्यांनी जीवन संपवले. विदर्भातील वाशिम व गडचिरोली हे जिल्हे आकांक्षीत जिल्हे म्हणून केंद्र सरकारने निवडले आहे. जिल्ह्याचे हे चित्र बदलविण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी त्यांनी हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. राजमार्गचे कार्यकारी अभियंता राकेश जवादे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील, अकोला व हिंगोली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button