मराठी कुटुंबीयांना मांसाहारीचे कारण देत नाकारली जातात घरे! | पुढारी

मराठी कुटुंबीयांना मांसाहारीचे कारण देत नाकारली जातात घरे!

राजेश सावंत

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गुजराती व मारवाडी विशेषतः जैन धर्मीय बिल्डर्सकडून गुजराती, मारवाडी लोकवस्ती असलेल्या भागांत मराठी कुटुंबीयांना घरे नाकारली जातात. एवढेच नाही, तर गुजराती लोकवस्ती असलेल्या इमारतींतील रहिवासीही मराठी माणसाला भाड्याने घरे देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे खिशात पैसा असूनही मराठी कुटुंबांचे आलिशान घराचे स्वप्न साकार होत नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्रातच राहत आहोत का? असा प्रश्न मराठी माणसाला पडला आहे.

मुलुंडमध्ये ‘शिवसदन’ या सोसायटीत मराठी कुटुंबाला कार्यालयासाठी जागा देण्यास गुजराती पदाधिकार्‍यांकडून नकार देण्यात आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्यांनी नकार दिला, त्यांनी माफीही मागितली. मात्र, या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा गुजराती बिल्डर्सकडून मराठी माणसाला नाकारण्यात येणार्‍या घराचा मुद्दा चर्चेला आला आहे.

दक्षिण मुंबईत मलबार हिल, पेडर रोड, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरिवली, तर पूर्व उपनगरात मुलुंड, घाटकोपर येथे मराठी माणसाला घर नाकारणार्‍या बिल्डरांची संख्या सर्वाधिक आहे.

मुलुंडमध्ये कार्यालयासाठी घर नाकारणार्‍या पदाधिकार्‍यांची तृप्ती देवरूखकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. एवढेच नाही, तर त्यांना सोसायटीच्या पदावरून हटवण्यातही आले आहे; पण घर नाकारणारा मराठी माणूस अशाप्रकारे कधीच तक्रार करत नाही.

पंकजा मुंडेंनाही घर नाकारले!

भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही मराठी म्हणून मुंबईत घर नाकारण्यात आले होते. तसा व्हिडीओ मुंडे यांनी मुलुंडच्या घटनेनंतर शेअर केला होता. माझे सरकारी घर सोडून मला घर घ्यायचे होते; पण मराठी लोकांना आम्ही घर देत नसल्याचे अनेक बिल्डर्सनी सांगितले. हे फार दुर्दैवी असल्याचे मुंडे यांनी आपल्या व्हिडीओत स्पष्ट केले.

Back to top button