पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राजकीय मतभेद असतील; पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, अशोभनीय आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेले विधान हे भाजपच्या संस्कृतीत बसणारे नाही, त्यामुळे पडळकर यांना भाजप पाठीशी घालणार नाही. त्यांच्यामुळे पवार यांचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो,' अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली. 'पवार यांनी मन मोठे करून पडळकरांना माफ करावे,' असेही ते म्हणाले. (Ajit pawar)
संबंधित बातम्या:
बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी पुण्यात शहर भाजप कार्यकारिणीची बैठक घेऊन नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे दिली गेली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली. विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो,' असे त्यांनी म्हटले आहे. (Chandrasekhar bawankule)
धनगर आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, 'प्रत्येक समाज महत्त्वाचा असून, त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून, मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पडळकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा, ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून, उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही,' असेही बावनकुळे म्हणाले.
'संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे लोक राजकारण करून संभ—म निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत,' असेही ते म्हणाले.
आमदार अपात्रवरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल काय टिप्पणी केली आहे, हे माहीत नाही. मात्र नार्वेकर कायद्याला धरून निकाल देतील. ते पक्षपातीपणा करणार नाहीत. विरोधकांना काहीच सूचत नसल्याने 'प्लॅन बी' नावाचा फुसका बॉम्ब सोडत आहेत. भाजपाकडे कोणताच 'प्लॅन बी' नसून त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य 45 हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. त्यामध्ये पुण्याच्या जागेचाही समावेश आहे.
अजित पवार आमच्याकडे आल्यावर रोहित पवार यांना संधी दिसू लागली आहे. त्यांना आपणच शरद पवारांचा वारसदार आहे, असे वाटू लागले असावे. भरती प्रक्रियेत येणार्या आरक्षणाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, काम थांबू नये, म्हणून कंत्राटी भरती केली. (rohit Pawar)