Vikram Lander : विक्रमशी आज संपर्क साधणार | पुढारी

Vikram Lander : विक्रमशी आज संपर्क साधणार

बंगळूर, वृत्तसंस्था : चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर पुन्हा एकदा सक्रिय होण्याची आशा निर्माण झाली आहे. चौदा दिवसांच्या रात्रीनंतर आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय झाला आहे. त्यामुळे लँडर व रोव्हरला सौरऊर्जा मिळण्यास सुरुवात होईल. ‘स्लीप मोड’वर पाठवलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी शुक्रवारी, 22 सप्टेंबरला पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा ‘इस्रो’ प्रयत्न करणार आहे. (Vikram Lander)

इस्रोच्या माहितीनुसार, लँडर आणि रोव्हरच्या सौर पॅनेलवर सूर्यप्रकाश पडताच ते काम करणे सुरू करू शकतात. इस्रोने 4 सप्टेंबरला विक्रम लँडरला स्लीप मोडवर पाठवले होते. तत्पूर्वी 2 सप्टेंबरला प्रज्ञान रोव्हरलाही स्लीप मोडवर पाठवण्यात आले होते. सध्या त्याचे सर्व पेलोडस् बंद असून केवळ रिसिव्हरच ऑन आहे, जेणेकरून बंगळूरहून कमांड घेऊन ते पुन्हा काम सुरू करू शकेल. ‘चांद्रयान-3’ मोहीम ही मुळात चौदा दिवसांसाठीच होती. याचे कारण म्हणजे चंद्रावरील दिवस पृथ्वीच्या चौदा दिवसांइतका असतो. (Vikram Lander)

तितकीच मोठी रात्रही असते व रात्रीच्या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे 238 अंश सेल्सिअस इतके घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात ऊर्जा निर्माण करू शकतात. पण रात्रीच्या वेळी त्यांची ऊर्जानिर्मितीची प्रक्रिया थांबते. तेथील भीषण थंडीने त्यांच्यामधील इलेक्ट्रॉनिक पार्टस्ही खराब होऊ शकतात. त्यामुळे शुक्रवारी या रोव्हर व लँडरशी पुन्हा संपर्क साधता येतो का, ते पुन्हा सक्रिय होऊन काम करू शकतात का, याचे कुतूहल आहे.

Back to top button