Pune News : कर सवलतीसाठी केवळ 50 हजार अर्ज | पुढारी

Pune News : कर सवलतीसाठी केवळ 50 हजार अर्ज

हिरा सरवदे

पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेने मिळकतकरात चाळीस टक्क्यांची सवलत पुन्हा लागू केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी ’पीटी- 3 फॉर्म’ भरून देणे अनिवार्य असून, सवलतीसाठी साडेतीन लाख अर्ज येणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 50 हजार अर्ज प्रशासनाकडे दाखल आहेत. दरम्यान, सवलतीसाठी अर्ज करण्याची तारीख 15 नोव्हेंबर असून, उर्वरित मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रकांसह अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने केले आहे.

सवलत कायम

महापालिकेच्या विनंतीनुसार राज्य शासनाने 2019 पासून शंभर टक्के करआकारणी आणि देखभाल-दुरुस्तीमध्ये देण्यात येणाऱ्या वजावटीतील 5 टक्के फरकाची रक्कम 2010 पासून वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने 2019 या आर्थिक वर्षापासून नवीन मिळकतींची आकारणी करताना शंभर टक्के आकारणी सुरू केली होती. तसेच फरकाच्या थकबाकीचीही बिले दिली होती. शहरातील नागरिक व विरोधकांनीही यावरून रान उठविल्यानंतर राज्य सरकारने 40 टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी देखभाल-दुरुस्तीतील 5 टक्के फरकाची रक्कम सुमारे 141 कोटी रुपयेदेखील माफ करण्याचा निर्णय घेतला.

कुठे भरायचा पीटी 3 फॉर्म

करआकारणी व करसंकलन विभागाने विधी विभागाकडून मसुदा तयार करून घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने 2019 पूर्वी ज्यांना 40 टक्के सवलत होती त्यांची सवलत कायम ठेवली आहे. मात्र, त्यानंतर ज्या-ज्या बांधकामांना शंभर टक्के कर लावण्यात आला आहे, त्यांनी कर सवलतीसाठी पीटी 3 हा फॉर्म भरून देणे बंधनकारक केले आहे. हा फॉर्म भरून 15 नोव्हेंबरपूर्वी 25 रुपये शुल्क भरून क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल करायचा आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार साडेतीन लाख मिळकतधारकांनी पीटी 3 फॉर्म भरून देणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 50 हजार अर्ज आले आहेत.

पीटी 3 अर्जासोबत ही कागदपत्रे जोडा

1) सोसायटीचा ना हरकत दाखला,
2) मतदान ओळखपत्र,
3) पासपोर्ट,
4) वाहनचालक परवाना,
5) गॅस कार्ड,
6) रेशन कार्ड

आजवर जमा झालेला मिळकतकर ः 13 कोटी 87 लाख 94 हजार 12 रुपये
करदाते ः 8 लाख 19 हजार 80 95 हजार 809 करदात्यांनी धनादेशाद्वारे 415 कोटी 88 लाख रुपये कर भरला.
5 लाख 19 हजार 648 करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने 812 कोटी 88 लाख रुपये कर जमा केला.
2 लाख 3 हजार 623 करदात्यांनी रोख स्वरूपात 158 कोटी 97 लाख रुपये जमा केले.

हेही वाचा

Ganeshotsav 2023 : पालिकेच्या विसर्जन हौदातच अस्वच्छ पाणी; पुण्यात गणेशभक्तांचा संताप

Pakistan Ganeshotsav : पाकमध्येही सुखकर्ता.. दु:खहर्ताचा जयघोष

Pakistan Ganeshotsav : पाकमध्येही सुखकर्ता.. दु:खहर्ताचा जयघोष

Back to top button