kolhapur news : कोल्हापूर हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्या; डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनंती | पुढारी

kolhapur news : कोल्हापूर हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्या; डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनंती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नसल्याने विकासावर मर्यादा येत आहेत. आसपासच्या गावांतील नागरिकांचे दैनंदिन जीवन शहराशी निगडीत आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी पर्याय नसल्याने शहर परिसरातील 8 ते 10 गावांची हद्दवाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी विनंती क्रिडाई पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली.

डॉ. जाधव यांनी, हद्दवाढ झाली तर कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा बदलेल. हद्दवाढीसाठी बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही दिली. कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात क्रिडाई पदाधिकार्‍यांनी डॉ. जाधव यांची दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव प्रमुख उपस्थित होते.

पुण्याची 22 वेळा हद्दवाढ, मग…

डॉ. जाधव म्हणाले, पुणे शहरातून मुळा व मुठा नद्या जात असूनही पुण्याचा विकास झाला. शासनाने थेट अध्यादेश काढून तब्बल 22 वेळा पुण्याची हद्दवाढ केली. आता आसपासची गावे हद्दवाढीत घ्या म्हणू लागली आहेत. त्यामुळे राज्य शासन हडपसर ही तिसरी महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे. मग कोल्हापूरला वेगळे नियम का लावता? कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने मोठे उद्योग येत नाहीत. शेजारच्या बेळगावचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पण लोकसंख्येअभावी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांत कोल्हापूरचा समावेश होत नसल्याने हजारो कोटी रुपये निधीपासून वंचित राहावे लागत आहे.

क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी कोल्हापुरात विकासकामांसाठी जागा शिल्लक नाही. हद्दवाढ झाल्याशिवाय विकास होणार नाही. शहराजवळील गावांना घरफाळ्यासह विविध करांची विनाकारण भीती वाटत आहे; पण वस्तुस्थिती तशी नाही. त्याबरोबरच प्राधिकरणामुळे नागरिकांची अडचण झाली आहे. ग्रामस्थ खासगीत प्राधिकरणऐवजी हद्दवाढीची मागणी करत असल्याचे सांगितले.

महामार्गावर उड्डाण पुलासाठी प्रयत्न

खोत यांच्यासह क्रिडाईच्या इतर पदाधिकार्‍यांनी सांगितले की, सन 1989 ला मोठा पूर आला; पण दुसर्‍या दिवशी पाणी उतरले. त्यानंतर 2004 मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बंधार्‍यासारखा उंच रस्ता केल्याने शहरात पुराचे पाणी येते. आता पुराचे पाणी पुढे घालवण्यासाठी 13 डक्ट केले जाणार आहेत. 2 ते 6 मीटर रुंदीचे डक्ट असल्याने त्यातून पुराचे पाणी पुढे जाणार नाही. त्याऐवजी तेथे उड्डाण पूल गरजेचा आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करावी, अशी विनंती क्रिडाई पदाधिकार्‍यांनी
डॉ. जाधव यांना केली.

डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरात महापुरावेळी पाणी येते. हे निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला तर शहरात पाणी येण्याचा प्रश्नच राहणार नाही. कोल्हापूर शहरातील पुराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी टोप ते उजळाईवाडी असा उड्डाण पूल आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांसोबतच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी दिली.

यावेळी क्रिडाईचे उपाध्यक्ष गौतम परमार व सचिन ओसवाल, सेक्रेटरी संदीप मिरजकर, गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, सचिन परांजपे, संचालक संदीप पोवार, आदित्य बेडेकर, अमोल देशपांडे, नंदकिशोर पाटील, विश्वजित जाधव, विजय माणगावकर, लक्ष्मीकांत चौगले, श्रीराम पाटील आदी उपस्थित होते.

सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागेल

यावेळी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशी विनंती क्रिडाई पदाधिकार्‍यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली. त्यासंदर्भात संबंधितांशी चर्चा सुरू असून लवकरच सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागेल, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.

Back to top button