नाशिक : तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकची आता पार्सल सेवा

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news
सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नवाढीच्या उपाययोजना सिटीलिंकने हाती घेतल्या आहेत. आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या धर्तीवर सिटीलिंकच्या बसेसमधून पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बस तिकीटावर जाहिरातीच्या माध्यमातून अतिरीक्त उत्पन्न मिळविले जाणार आहे. इतकेच नव्हे तर, प्रवाशांनी २० किलोपेक्षा अतिरीक्त सामान(लगेज) बसमध्ये आणल्यास त्यासाठी स्वतंत्र तिकीट काढावे लागणार आहे.

संबधित बातम्या :

सिटीलिंक संचालक मंडळाने यासंदर्भातील प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता याबाबत नियमावली तयार करण्याचे काम सिटीलिंक व्यवस्थापनाने सुरू केले आहे. सिटीलिंकची बससेवा नाशिककरांसाठी वरदान ठरत असली तरी महापालिकेला मात्र या बससेवेतून तोटा सहन करावा लागत आहे. ८ जुलै २०२१ ते मार्च २०२३ या दरम्यान सिटीलिंकला ८६ कोटींचा तोटा झाला आहे. तर गेल्या पाच महिन्यात दरमहा साडेचार कोटींचा तोटा लक्षात घेता एकूण तोट्याच्या आकड्याने शंभर कोटींचा आकडा ओलांडला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिटीलिंकच्या बस थांब्यांवर जाहीरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, त्यात अपेक्षित यश आलेले नाही. आता उत्पन्नवाढीसाठी पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटीलिंकने घेतला आहे. सिटीलिंकच्या बसेस, पिंपळगाव, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी पर्यत धावतात. त्यामुळे या भागात पार्सल सेवा सुरू केली जाणार असून त्याचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे. यासोबतच सिटीलिंकच्या तिकीटावर मागच्या बाजूला आता कंपन्यांच्या जाहीरातीही झळकणार आहे.

२० किलोपेक्षा अधिक लगेजसाठी तिकीट

शहरातील प्रवाशांना आता एसटीच्या धर्तीवर सिटीलिंकमध्ये २० किलो सामान सोबत घेवून जाता येणार आहे. यापेक्षा अधिक सामान असेल तर, मात्र त्याचे स्वंतत्र तिकीट प्रवाशांना काढावे लागेल. लगेज तिकीट दर निश्चित केले जात आहेत. सिटीलिंकच्या संचालक मंडळाने मान्यता दिल्यानंतर यासंदर्भातील नियमावली तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

प्रति कि.मी.३० रुपयांचा तोटा

सध्या सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या बसेसकरिता प्रति किलोमीटर ७५ रुपयांचा खर्च होत आहे. तर, तिकीट विक्रीतून केवळ ४५ रुपये प्रति किलोमीटर महसूल मिळत आहे. त्यामुळे सध्या प्रति किलोमीटर ३० रुपयांचा तोटा सिटीलिंकला सहन करावा लागत आहे.

एसटीच्या धर्तीवर पार्सल सेवा सुरू करण्यासह तिकीटावर जाहीरातींना परवानगी देण्याचा प्रस्ताव सिटीलिंक संचालक मंडळाने मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील नियमावली तयार केली जात असून संचालक मंडळापुढे अंतिम मंजूरीसाठी ठेवली जाणार आहे.

-मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news