पुणे : माझे पती बंगाली आणि मी मराठी भाषक… आमच्याकडे गेल्या 25 वर्षांपासून बाप्पांचे आगमन होत आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन दहाही दिवस गणेशोत्सव मनोभावे साजरा करतो. अख्ख्या कुटुंबात चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण असते. यंदाचा गणेशोत्सवही आमच्या कुटुंबासाठी आनंदाची, उत्साहाची अन् मांगल्याची पालवी घेऊन आला आहे आणि आम्ही सगळे जण जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत आहोत, अशी भावना शिल्पा बासू यांनी व्यक्त केली.
बासू कुटुंबीयांप्रमाणे पुण्यात स्थायिक झालेल्या अनेक अमराठी भाषकांकडे गेल्या कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. कोणी बंगाली आहे, तर कोणी गुजराती, पण बाप्पाच्या भक्तीचा रंग सगळ्यांचा एकच. कारण बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या घरांत चैतन्य तर नांदते. प्रत्येक जण भक्तिरंगात न्हाऊन जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक अमराठी भाषक कुटुंबांमध्ये जल्लोषात बाप्पाचे आगमन झाले असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास सजावटही करण्यात आली आहे.
शिल्पा बासू म्हणाल्या, की माझ्या माहेरी कोकणात श्रीगणेशाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होते. त्यामुळे लहानपणापासून आमच्या घरात गणेशोत्सवाचे आनंदी वातावरण अनुभवले आहे. माझे पती मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकता येथील असले, तरी ते लहानपणापासून पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशोत्सव लहानपणापासून अनुभवला आहे. त्यामुळेच आमचे या उत्सवाशी जुने नाते असून, गणेशोत्सवाचा हा प्रवास अविरतपणे सुरू आहे.
सत्येंद्र राठी यांच्या घरीही गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. राठी हे गणेश मंडळातील कार्यकर्ते असून, सार्वजनिक गणेशोत्सवाशी त्यांचे खूप जवळचे नाते आहे. याबाबत ते म्हणाले, की मी माहेश्वरी समाजातला असलो, तरी माझ्या घरी लहानपणापासून श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. माझ्या आजोबांनी हा वारसा सुरू केला आणि तो वारसा आम्ही पुढे नेत आहोत. प्रत्येकाचा महाराष्ट्रीय संस्कृतीशी एक बंध जुळला आहे. म्हणून कुठेतरी आमच्याही कुटुंबात बाप्पाचे आगमन होते. हा सोहळा एक वेगळाच आनंद देऊन जातो.
गुजराती कुटुंबातील असलेल्या राधिका नागर यांच्या घरीही दरवर्षी श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. बाप्पाच्या आगमनाने घरामध्ये आनंद दरवळतो, असे सांगत राधिका म्हणाल्या, की इतकी वर्षे आमचे कुटुंब पुण्यात वास्तव्यास असल्याने आमचे मराठी संस्कृती, भाषेशी खूप जवळचे नाते आहे. गणेशोत्सवातील सजावटीपासून ते इतर नियोजनात कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग असतो. प्रत्येक जण वेळ काढून उत्सवात बाप्पाच्या आरतीला आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित असतो. गणेशोत्सवात आम्ही वेगवेगळा प्रसादही तयार करतो. कधी मोदक, तर कधी लाडू… असा गोड प्रसादही तयार केला जातो. तर, खास गुजराती पदार्थही नैवेद्यासाठी तयार करतो.
हेही वाचा