‘आदित्य’ला बाजूस सारून ‘विक्रम’ला मुख्यमंत्र्यांची पसंती | पुढारी

‘आदित्य’ला बाजूस सारून ‘विक्रम’ला मुख्यमंत्र्यांची पसंती

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा :  राजकीय मंडळी नावावरून आणि खुर्चीवरून कधी काय खेळ खेळतील हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार रविवारी येथील सिद्धार्थ उद्यानात वाघांच्या बछड्यांच्या नामकरणावरून रंगला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बछड्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी आदित्य नावाची चिठ्ठी उपमुख्यमंत्र्यांनी काढताच मुख्यमंत्र्यांनी ती चिठ्ठी बाजूला करीत विक्रम नावाची चिठ्ठी काढून त्याची घोषणा केली.

सिद्धार्थ उद्यानातील अर्पिता वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काचपात्रातून एक चिठ्ठी उचलली. त्यात असलेल्या श्रावणी नावावरून मादी बछड्याचे नाव श्रावणी ठेवण्यात आले. यानंतर अजित पवार यांनी उचललेल्या चिठ्ठीवर आदित्य नाव होते. त्यांनी मिश्कील हसत ही चिठ्ठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाखवली. मुनगंटीवार यांनी ही चिठ्ठी बाजूला केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याही लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तत्परतेने काचपात्रातून दुसरी चिठ्ठी काढत त्यावरील विक्रम नाव वाचले आणि दुसर्‍या बछड्याचे नाव विक्रम जाहीर केले. यानंतर तिसर्‍या बछड्याचे नाव कान्हा ठेवण्यात आले. आदित्य नावावरून झालेला हा प्रकार सगळ्यांच्याच लक्षात आला होता. या प्रकरणाची उपस्थितात चांगलीच चर्चा रंगली.

Back to top button