नाशिक : कवी कुमार विश्वास यांचे रद्द झालेले हिंदी कविसंमेलन पुन्हा होणार, प्रवेश नाकारल्याने झाला होता वाद | पुढारी

नाशिक : कवी कुमार विश्वास यांचे रद्द झालेले हिंदी कविसंमेलन पुन्हा होणार, प्रवेश नाकारल्याने झाला होता वाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कालिदास कलामंदिर येथे हिंदी दिनाच्या दिवशी प्रवेश नाकारल्यामुळे हिंदी-मराठी भाषावादातून रद्द झालेला डॉ. कुमार विश्र्वास यांचे हिंदी कविसंमेलन नवीन ठिकाणी होणार असून, लवकरच त्याबाबत कळविण्यात येईल, असे कवी डॉ. कुमार विश्वास यांनी फेसबुक पोस्टद्वारे तसेच हिंदी प्रसारिणी सभेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संबधित बातम्या :

हिंदी प्रसारिणी सभेच्या वतीने सांगण्यात आले की, एका दैनिकात कार्यक्रमाची केवळ जाहिरात देण्यात आली होती. परंतु कोणत्याही दैनिकात अधिकृत प्रेसनोट दिली नव्हती. दैनिकांनी कार्यक्रमाची बातमी त्यांच्या मर्जीने छापली आहे, असे असताना दैनिकांमध्ये छापून आलेल्या बातम्या मात्र हिंदी प्रसारिणी सभेच्या वतीने फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम मोफत हाेता, तिथे कुठेही केवळ पासधारकांसाठी असा उल्लेख नव्हता. कुमार विश्र्वास यांचा चाहता वर्ग मोठा असल्याने कार्यक्रमाला गर्दी होणार होती. याचा अंदाज न आल्याने हा गोंधळ उडाल्याचे बोलले जाते आहे.

संस्थेच्या वतीने २०१९ मध्ये हिंदी दिनाच्या दिवशी डॉ. कुमार विश्र्वास यांचा कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृहात घेतला होता. त्यावेळी पास उपलब्ध होते. शिवाय सभागृहाची बैठक व्यवस्था मोठी असल्याने कोणतीही अडचण आली नव्हती. कार्यक्रमाचा अनुभव पाठीशी असताना यावेळी कालिदास सभागृहाची निवड का करण्यात आली? असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.

कवी डॉ. कुमार विश्र्वास यांची पुढील तारीख मिळाल्यानंतर नवीन ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी आमचे पुढील नियोजन सुरू आहे.

– रामप्रकाश सिंह, सहसचिव, हिंदी प्रसारिणी सभा

हेही वाचा :

Back to top button