नाशिक: युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे संभाजीनगर नंतर शनिवारी (दि.१६) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून निफाड, सिन्नर व इगतपुरी तालक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून ते शेतकऱ्यांसमवेत संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
संबधित बातम्या :
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. शुक्रवारी(दि.१५) त्यांनी छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शनिवारी(दि.१६) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील नुकसानग्रस्त भागाची सकाळी ११.३० वाजता पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे दुपारी १२.३०वाजता ते नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. संभाजीनगरच्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना 'धीर सोडू नका आता सरकारच्या मागे लागू' असे आश्वासन दिले आहे. बिल्डर आणि कंत्राटदारांचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का,असा सवालही त्यांनी केला आहे. आता नाशिकमधील दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी करताना ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :