पुणे : घाटमाथ्याला शनिवार व रविवार असा दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्याने शहरातही दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. तसेच, 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या काळातही पावसाबाबत विशेष अंदाज दिला जाणार आहे. गेले काही दिवस शहरात तापमानाचा पारा 26 वरून 31 ते 33 अंशांवर गेल्याने प्रखर उन्हाचा चटका व उकाडा जाणवत होता.
शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत असेच वातावरण होते. मात्र, दुपारी 1 नंतर आकाशात ढगांची गर्दी झाली अन् गार वारा सुटल्याने शहरात पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले. काही भागांत हलका पाऊस पडला. शनिवार व रविवार असे दोन दिवस घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शहर व परिसरात हे दोन्ही दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. शुक्रवारी शहराच्या तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होऊन गार वारा सुटला होता.
19 सप्टेंबरपासून पुणे वेधशाळा दररोज शहरातील पावसाचा विशेष अंदाज देणार आहे. या उत्सवात शहरात पावसाचे वातावरण राहणार असून, आगामी सहा दिवस शहरात मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
गेले काही दिवस शहरात तापमानाचा पारा 31 ते 34 अंशांवर गेला होता. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत होता. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर शहरात ढगांची गर्दी झाली. गार वारा सुटल्याने शहराच्या तापमानात तब्बल 8 ते 10 अंशांनी घट झाली. पारा 32 अंशांवरून 18 ते 22 अंशांवर खाली आला.
हेही वाचा