ठेकेदार धुमाळ कोणाचे पाहुणे? : शौमिका महाडिक | पुढारी

ठेकेदार धुमाळ कोणाचे पाहुणे? : शौमिका महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृतसेवा : महाडिकांचे पाहुणे असल्याचा आरोप करून पुणे येथील गोकुळ पॅकिंगचा नवा ठेका रणजित धुमाळ यांना दिला आहे, परंतु हे रणजित धुमाळ कोण आणि ते कोणाचे पाहुणे आहेत, असा सवाल गोकुळच्या विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी शुक्रवारी उपस्थित केला. सर्वसाधारण सभेत महाडिक यांना बोलू दिले नसल्याने त्यांनी आपली भूमिका समांतर सभा घेऊन कार्यकर्त्यांसमोर मांडली. सभेत बोगस सभासदांना बसवून सत्ताधार्‍यांनी विषय मंजूर करून घेतले. त्यामुळे ही सभाच बेकायदेशीर असल्याचेही शौमिका महाडिक यांनी यावेळी सांगितले.

महाडिक म्हणाल्या, सभेत आम्हाला बोलू दिले नाही. बोगस ओळखपत्र तयार करून सभासद नसलेल्या कार्यकर्त्यांनाच सभा सुरू होण्यापूर्वीच आणून बसविले होते. त्यामुळे मूळ दूध उत्पादकांना बसण्यासाठी जागाच दिली नाही. संचालकांनी बोर्ड मिटींगमध्येच मते मांडावीत, सभासदांच्या सभेत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे वक्तव्य चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले होते. त्याला उत्तर देताना शौमिका महाडिक यांनी सभासदांनीच मला निवडून दिले आहे. त्यांच्या वतीने प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे.

चार भिंतीच्या आत संचालकांच्या बैठकीत काही मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा जाहीर सभेत लोकांसमोर प्रश्वन उपस्थित करणे मला योग्य वाटते आणि त्यात गैर काहीच नाही. चार भिंतीच्या आत लपवून कारभार करणे ही आमची संस्कृती नाही. ती सतेज पाटील यांची संस्कृती आहे. अर्धसत्य सांगून लोकांची दिशाभूल करून राजकारण करणे हेच काम सतेज पाटील करतात, पण आम्ही पूर्णसत्य सांगण्यासाठी जनतेसमोर येतो, असेही शौमिका महाडिक म्हणाल्या.

घोषणाबाजी करत महाडिक गटाचा सभेत प्रवेश

महादेवराव महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सभा मंडपात प्रवेश केला. कार्यकर्त्यांना अडथळा ठरणारे बॅरेकेडिंग तोडून कार्यकर्त्यांनी सभा मंडपात प्रवेश केला. यावेळी सत्तारूढ गटाकडूनही सतेज पाटील, मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभेत गोंधळ, तणाव निर्माण झाला.

सभेत राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा महाडिकांचा आरोप

गोकुळच्या शुक्रवारच्या सभेत सुरुवातीला राष्ट्रगीत लाऊडस्पीकरवर लावण्यात आले, पण ते पूर्ण होण्याअगोदरच बंद केल्याने हा राष्ट्रगीताचा अवमान आहे, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, सभासद नसलेल्या कार्यकर्त्यांना सभेमध्ये बसवून विषयपत्रिकवेरील 1 ते 13 विषय मंजूर करण्यात आले. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा आजच्या सभेतील विषय गोकुळचे नुकसान करणारा आहे. हा कारखाना अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचा घाट कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button