नाशिक: पुढारी वृत्तसेवा
आरोग्य, घनकचरा व अग्निशमन विभागातील ६७१ पदांच्या भरतीप्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला असून दिवाळीआधी महापालिकेत नोकरभरतीचा बार उडणार आहे. भरती प्रक्रियेसाठी नियुक्ती केलेल्या टीसीएस संस्थेने उमेदवारांच्या परीक्षेचे स्वरूप निश्चित केले असून यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मान्यतेने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे.
संबधित बातम्या
शहराचा विस्तार आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेतील कर्मचारी संख्या मात्र घटत आहे. जुन्या आकृतीबंधातील ७०९२ पैकी सुमारे तीन हजार पदे सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाल्याने उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. सुधारीत आकृतीबंधातील प्रस्तावानुसार राज्य शासनाने महापालिकेसाठी अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ नवीन पदांना मंजुरी दिली आहे. अ संवर्गातील डॉक्टरांची ८४ पदं वगळता शासन निर्देशांनुसार ब ते ड संवर्गातील ५८७ पदांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून त्यांची परिक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीने महापालिकेकडून या परिक्षेसंदर्भातील फॉरमॅट मागवला होता. प्रशासन विभागाने वैद्यकीय, अग्निशमन आणि घनकचरा विभागांना यासंदर्भातील निर्देश दिले होते. त्यानुसार या तीनही विभागांनी उमेदवारांना परिक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा फॉरमॅट प्रशासन उपायुक्तांकडे सादर केले आहे. प्रशासन उपायुक्तांकडून हा फॉरमॅट आता आयुक्तांपुढे सादर केला असून आयुक्तांच्या मान्यतेनंतर टीसीएस कंपनीला प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
डॉक्टरभरतीचा पेच कायम
'अ' संवर्गातील डॉक्टरांच्या ८४ पदांच्या भरतीसंदर्भातील पेच प्रशासनासमोर कायम आहे. याबाबत महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. परंतू शासनाला दोनदा स्मरणपत्र पाठवून देखील प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
टीसीएसच्या सूचनेनुसार महापालिकेने नोकरभरतीसंदर्भात परीक्षेचे स्वरूप निश्चित केलेअसून लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव टीसीएसकडे पाठविला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये या पदांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात होईल.
-लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त प्रशासन,
हेही वाचा :