अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले | पुढारी

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले

श्रीनगर, वृत्तसंस्था : अनंतनागच्या कोकरनाग भागात सुरक्षा दलांवर हल्ला करून दोन लष्करी अधिकार्‍यांसह एका पोलिस अधिकार्‍याची हत्या करणार्‍या दहशतवाद्यांभोवती सुरक्षा दलांनी फास आवळला आहे. दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये गोळीबाराच्या फैरी सातत्याने झडत आहेत.

या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराच्या तुकड्या व पोलिस दल सरसावले असून, चकमक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बुधवारी (दि. 13) अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात भारतीय सैन्य आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्य दलांच्या निधड्या जवानांनी या दहशतवाद्यांचा कडवा प्रतिकार केला; पण त्यात राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि काश्मीर पोलिस उपाधीक्षक हुमायून भट या तिघांना वीरमरण आले.

बुधवारी सायंकाळी दहशतवाद्यांविरोधी शोधमोहीम थांबवण्यात आली. गुरुवारी पहाटेपासूनच लष्कराच्या अतिरिक्त पथकांनी व पोलिस दलाने पुन्हा एकदा चढाई केली आणि चकमक सुरू झाली. लष्कराच्या तुकड्यांनी कोकरनाग जंगलात दहशतवादी लपलेल्या भागाला चारी बाजूंनी वेढा दिला असून, जोरदार गोळीबार सुरू आहे. दोन ते तीन दहशतवादी जंगलात लपून असावेत, असा कयास आहे.

या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी भारतीय सैन्याने अत्याधुनिक ड्रोन व हीट सेन्सर्सचा वापर केला असून, त्या माहितीच्या आधारे या दहशतवाद्यांभोवती फास आवळला जात आहे. या दहशतवाद्यांचा लवकरच खात्मा केला जाईल, अशी खात्री लष्कराला आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर गनशिप्सही जंगलावर घिरट्या घालत असून, लपलेल्या दहशतवाद्यांकडून आगेकूच करणार्‍या सैन्याच्या दिशेने गोळीबार होत असल्याचे सूूत्रांनी सांगितले.

कर्नल मनप्रीत सिंग : न्यू चंदीगडमधील भडोजिया गावचे रहिवासी असलेले कर्नल मनप्रीत सिंग 2003 मध्ये सैन्यात भरती झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना सेना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची लवकरच दुसर्‍या ठिकाणी बदली होणार होती. त्यांचे वडील आणि आजोबा यांनीही लष्करात सेवा बजावली असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

मेजर आशिष धोनक : मेजर धोनक हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बिंझौल गावचे रहिवासी होते. 2013 मध्ये पहिल्या प्रयत्नात एसएसबी परीक्षा पास होत ते शीख रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट बनले. दोन वर्षांपासून ते काश्मिरात कार्यरत होते. यावर्षीच त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या घराच्या गृहप्रवेशानिमित्त ते गावी येणार होते. त्यापूर्वीच ते शहीद झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन बहिणी, आई-वडील असा परिवार आहे.

डीएसपी हुमायून भट : काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे रहिवासी असलेले डीएसपी हुमायून भट 2019 च्या बॅचचे अधिकारी होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एका लहान मुलगीही आहे. त्यांचे वडील गुलाम हसन भट पोलिस उपमहानिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते.

‘इसिस’च्या दहशतवाद्यास दिल्लीत अटक

कर्नाटकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात ‘इसिस’च्या दहशतवाद्यास राष्ट्रीय तपास पथकाने गुरुवारी (एनआयए) अटक केली. अराफत अली असे या दहशतवाद्याचे नाव असून, नैरोबीतून (केनिया) तो दिल्लीत आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

2020 पासून फरार होता. विदेशातून राहून तो भारतविरोधी कारवायात सामील झाला होता. विदेशात वास्तव्य करताना कर्नाटकमधील मुस्लिम तरुणांना ‘इसिस’च्या जाळ्यात ओढत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मोहम्मद शरीक आणि माज मुनीर अहमद हे अलीचे साथीदार असून, त्यांना मंगळूर बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंगळूरमधील मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी जाताना रिक्षामध्ये बॉम्बस्फोट झाला.

Back to top button