कारभार न सुधारल्यास गोकुळचा ‘शेतकरी संघ’ : शौमिका महाडिक | पुढारी

कारभार न सुधारल्यास गोकुळचा ‘शेतकरी संघ’ : शौमिका महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दूध संकलन, ठेवीतील घट, संचालक खर्चात वीस लाखांनी वाढ, व्यापारी नफ्यात घट असाच कारभार सुरू झाल्यास गोकुळचा शेतकरी संघ होण्यास वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गुरुवारी सत्ताधार्‍यांवर चढविला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सभेत प्रश्न मांडण्याची परवानगी दिली, तर आपण व्यासपीठावर निश्चित बसू. परंतु, गेल्यावर्षीचा अनुभव पाहता ते बोलण्यासाठी माईक देतील की नाही माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आमच्या संपर्क सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्हाला आम्ही मतदान केले नाही, ही आमची चूक झाल्याचे काही उत्पादकांनी कबूल केले. हीच आपल्या कामाची पोेचपावती आहे. उत्पादकांनी दिलेले प्रश्न देण्यासाठी गेले असता बोर्ड सेक्रेटरींनी तुमचे प्रश्न न स्वीकारण्याच्या वरिष्ठांकडून सूचना असल्याचे सांगितले.

सहकार विभागाकडे दाद मागितल्यानंतर ते स्वीकारले. आमचे अर्ज स्वीकारू नये, असे सांगणारे कोण? त्यांचे नाव जाहीर करावे. गोकुळमधील राजकारणाला कंटाळून काही संस्थांनी गोकुळला दूध घालण्यास बंद केले आहे. त्यामुळे अमूल दूध जिल्ह्यात वाढत आहे. आज अमूलने बारा तालुक्यांत केंद्रे सुरू केली आहेत. लोकांना पर्याय उपलब्ध होऊ लागल्याने दूध संस्था अमूलकडे वळू लागल्या ही गोकुळसाठी धोक्याची घंटा आहे. संस्था वाढल्या; पण गोकुळचे दूध संकलन 5 लाख लिटरने घटले याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी माजी संचालक विश्वास जाधव, प्रताप पाटील-कावणेकर, संग्राम कुपेकर, दिलीप पाटील, तानाजी पाटील, विजय महाडिक आदी उपस्थित होते.

सतेज पाटील यांचे ज्ञान टँकरपुरते सिमित

आ. सतेज पाटील यांचे गोकुळमधील ज्ञान केवळ महाडिक यांच्या टँकरपुरतेच सिमित आहे. त्यामुळेच आपल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आ. पाटील यांनी सभेत महादेवराव महाडिक व्यासपीठावर असताना त्यांचा काय संबंध, असा प्रश्न विचारला होता. आता आ. पाटील यांचा गोकुळशी काय संबंध, असा खडा सवालही महाडिक यांनी केला.

संचालकांनी बोर्डात प्रश्न विचारायचे असतात : डोंगळे

दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे खरे मालक आहेत. सभेत प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. संचालकांनी प्रश्न संचालक मंडळाच्या बैठकीत उपस्थित करावयाचे असतात. दूध उत्पादक सभासदांतर्फे कोण बोलणार असतील, तर ते चुकीचे होईल. त्यांचे अधिकार घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.

महाडिक यांनी या प्रश्नांची मागितली उत्तरे

* काटकसरीने कारभार केला मग खर्चात वाढ कशी?
* सहकारीऐवजी खासगी संस्थांकडून दूध घेण्याचे कारण काय?
* पशुखाद्य कारखान्यात कोटीची बचत, मग नफा फक्त 1 लाख कसा?
* दूध संकलनात घट असताना संकलन खर्चात वाढ कशी?
* उलाढाल वाढूनही व्यापारी नफ्यात घट का?
* रणजित धुमाळ यांच्याकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका आहे?
* बाराशे संस्था उघडून नक्की काय साधलं?

महाडिक म्हणाल्या

* गोकुळ बचाव कृती समिती कुठे आहे?
* पशुखाद्याची गुणवत्ता बिघडली
* सभेत घुसून तोडफोड करण्याची आमची संस्कृती नाही.
* वासाचे दूध जाते कोठे?

Back to top button