अभियंता दिन विशेष : राष्ट्रविकासात अभियंत्यांचे अमूल्य योगदान

अभियंता दिन विशेष : राष्ट्रविकासात अभियंत्यांचे अमूल्य योगदान

अभियंते आणि वैज्ञानिकांनी मानवी जीवन समृद्ध केले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊन सुखकर जीवनाचा आनंद लुटणे शक्य झाले आहे. आधुनिक काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अभियंत्यांनीही यामध्ये मोठे योगदान दिले आहे. या तमाम अभियंत्यांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा अभियंता दिन!

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी देशात अभियांत्रिकीचा पाया घातला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ अभियंताच नाही, तर एक प्रतिष्ठित विद्वान म्हणूनही त्यांची ख्याती होती. इंजिनिअर झाल्यानंतर विश्वेश्वरय्या यांना मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी लागली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे आयोगात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. दक्षिण भारतात त्यांनी अतिशय गुंतागुंतीची पाटबंधारे व्यवस्था व्यवस्थितपणे अंमलात आणली. धरणाला आपोआप उघडणारे आणि बंद होणारे दरवाजे लावणे हा त्यांचाच शोध. याचे पेटंटही त्यांनी घेतले होते. अशा प्रकारचे दरवाजे असलेले पहिले धरण 1903 मध्ये पुण्याजवळील खडकवासला जलाशयावर बांधले. पाणी सर्वोच्च पातळीपर्यंत वाढत नसे तोपर्यंत धरणाचे दरवाजे उघडत नसत. यामुळे जलाशयात जास्तीत जास्त पाणी साठवले जाऊ लागले आणि पुराचा धोका बराच कमी झाला. शिवाय धरणाला कोणतीही बाधा निर्माण झाली नाही. खडकवासला येथे विश्वेश्वरय्या यांचे धरणाचे डिझाईन यशस्वी झाल्यावर तशाच प्रकारची धरणे ग्वाल्हेरमधील टिगरा येथे आणि मंड्या येथे कृष्णराज सागर धरण बांधण्यात आले.

हैदराबाद शहराचे पुरापासून रक्षण करण्यासाठी जेव्हा विश्वेश्वरय्या यांनी पूरसंरक्षक व्यवस्थेचे डिझाईन तयार केले, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आले. समुद्राच्या धूप होण्यामुळे विशाखापट्टणम बंदराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जी व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्याची प्रेरणाही विश्वेश्वरय्याच होते. कावेरी नदीवर बांधण्यात आलेले कृष्णराज सागर धरणाच्या अगदी संकल्पनेपासून ते उद्घाटनापर्यंत विश्वेश्वरय्या यांचे त्यावर नियंत्रण होते. या धरणामुळे आशियातील सर्वात मोठा जलाशय निर्माण झाला. विश्वेश्वरय्या यांना म्हणूनच म्हैसूर राज्याचे जनक म्हणतात. विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूरचे दिवाण असताना राज्यात अनेक उद्योग संस्था, कारखाने, व्यावसायिक शिक्षण संस्था सरकारच्या अखत्यारीत उघडल्या. त्यात म्हैसूर सोप फॅक्टरी, पॅरासिटॉईड प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जयचामराजेंद्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, बंगळूर कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, सेंच्युरी क्लब, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर अनेक औद्योगिक संस्था त्यांच्या पुढाकाराने सुरू झाल्या.

म्हैसूरचे दिवाण असताना त्यांनी राज्यातील उद्योगात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. तिरुमला आणि तिरुपती या दरम्यान रस्ता बांधण्याची योजनाही त्यांच्याच पुढाकाराने तयार करण्यात आली. विश्वेश्वरय्या त्यांच्या कामाप्रती निष्ठा, वेळेचे व्यवस्थापन आणि समर्पित भावना यासाठी प्रसिद्ध होते. देशभरात स्वातंत्र्यानंतर उभारलेली शेकडो धरणे ही पं. जवाहरलाल नेहरूंच्या भाषेत आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे बनली. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यासारख्या द्रष्ट्या अभियंत्यांनी अनेक स्वप्नवत वाटणारे प्रकल्प साकार केले आणि सुजलाम् सुफलाम् भारताचे स्वप्न सत्यात उतरू लागले. अभियंते आणि तंत्रज्ञान यांचे विकासातले स्थान केवळ अनन्यसाधारण आहे. समाज पुढे येण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. समर्थ नेतृत्व हवे. उत्तम संघटन हवे. उत्कृष्ट राजकीय प्रणाली हवी. परंतु, या सर्वांना अभियंत्यांची आणि तंत्रज्ञानाची साथ नसेल, तर विकासाचा गाडा चिखलात रुतल्याशिवाय राहणार नाही.

भारत बनले बुद्धिमंतांचे राष्ट्र

1990 नंतर ग्लोबलायझेशनचे वारे जगभरात वाहू लागले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी मग भविष्याची चाहूल ओळखून देशाने स्वातंत्र्यापासून अवलंबलेले समाजवादी धोरण बदलून नव्या आर्थिक सुधारणांचे धोरण स्वीकारले. राष्ट्राराष्ट्रांमधल्या भिंती जमीनदोस्त झाल्या. लायसेन्स राज संपुष्टात येऊ लागले. सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन कमीत कमी खर्चात करून ते जगभर विकण्याचे नवे व्यापार विषयक धोरण अंमलात आले. उत्पादन खर्च कमी करायचा, तर तंत्रज्ञानाइतका दुसरा योग्य मंत्र नाही. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हा तर नव्या जगाचा मूलभूत मंत्र झाला. संपूर्ण जगभर भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या बुद्धिमतेेचा आज बोलबाला आहे. या क्षेत्रात भारतीय अभियंत्यांच्या बुद्धिमत्तेेने दाखविलेली चमक आणि चिकाटी भारताला पॉवरफुल्ल देशांच्या पंगतीत नेऊन बसविण्यास पूरक ठरली. सॉफ्टवेअरच्या निर्यातीतून देशात आलेले परकीय चलन भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत बनवून गेले, हे विसरता कामा नये.

भारतीय अभियंत्यांचा जगभर बोलबाला

केवळ माहिती-तंत्रज्ञानाचे क्षेत्रच नव्हे, तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना प्रकल्पासारखे धरण-जलविद्युत प्रकल्प असोत किंवा सर्वोच्च शिखरावरील रेल्वे प्रकल्प असोत किंवा समुद्रातील दूर पल्ल्याचे सेतू असोत किंवा गगनचुंबी इमारती असोत; त्यांच्या निर्मितीमुळे मानवी जीवन सुखकर होण्यास मदत झाली आहे. या तमाम अभियंत्यांविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा अभियंता दिन! भारतीय अभियंत्यांच्या संपूर्ण जगभरात बोलबाला राहिला आहे. यासंदर्भात एक आठवण नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे महाराष्ट्रातील कोकण रेल्वेसारखा एक बोगदा ब्रिटनमध्ये करण्यात येत होता. अखेरीस तिथल्या अभियंत्यांनी आता भारतीय अभियंत्यांचा सल्ला घेतल्या शिवाय पर्याय नाही, असा अहवाल सरकारला सादर केला होता. ज्या ब्रिटिशांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या देशावर राज्य केले आणि ज्या गोर्‍या लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेविषयीचा अहंकार होता त्या देशाला भारतीय अभियंत्यांची गरज भासावी यातच आपल्या अभियांत्रिकीचे मोठेपण आहे. गतवर्षी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वर एकाच मार्गिकेमध्ये 75 कि.मी.चा बिटुमिनस काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news