

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवरील म्हसरूळ नजीकच्या मोराडे वस्ती परिसरात रविवारी (दि. १०) मध्यरात्री बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याने मळे परिसरातील वस्त्यांवर घबराट पसरली आहे. परिसरात बिबट्या फिरलेल्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे उमटलेले ठसे आढळले असून वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर बऱ्याच छोट्या-छोट्या लोकवस्ती आहेत. येथील रहिवाशांचा मूळ व्यवसाय शेती आहे. याच लिंक रोडवर मोराडे, लभडे, बोरस्ते, भोसले, जाधव-देशमुख व कडाळे वस्ती आहेत. या ठिकाणी आडगाव येथे अनिल मोराडे यांची शेती आहे. ते तेथेच कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रविवारी मोराडे कुटुंबीय झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या घराबाहेरील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. त्यातील एका कुत्र्याच्या गळ्याला काटेरी पत्र्याचा पट्टा असल्याने त्याला पकडता आले नाही. बिबट्याने दुसऱ्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला ओढून नेले. यावेळी कुत्रा भुंकण्याचा आवाज आल्याने अनिल मोराडे घराबाहेर आले असता, बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला ओढून नेल्याचे लक्षात आले. दरम्यान, म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील जाधव- देशमुख वस्तीवर पाचवर्षीय मुलावर जुलै २०२२ मध्ये बिबट्याने हल्ला केला होता. त्यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यात आले होते.
बिबट्याचे दिवसा दर्शन
म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवर पाच दिवसांपूर्वी लभडे वस्ती येथे शेतकामासाठी आलेल्या मजुरांना चक्क भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या भागात शेतमजूर काम करण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे. पाच दिवसांपूर्वी लभडे वस्तीच्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
हेही वाचा ;