राहुरी : कर्जाच्या नावाखाली व्यापार्‍याला घातला गंडा; 23 लाखांची फसवणूक, पोलिसात गुन्हा | पुढारी

राहुरी : कर्जाच्या नावाखाली व्यापार्‍याला घातला गंडा; 23 लाखांची फसवणूक, पोलिसात गुन्हा

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलिसी मार्फत व्यवसायासाठी दिड करोड रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगून राहुरी येथील एका व्यापार्‍याला सुमारे 23 लाख रुपयांना गंडा घातला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापार्‍याने 14 जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अश्पाक आब्बास तांबोळी, (वय 50 वर्षे, रा. सोनगाव, ता. राहुरी) हे गोळी, बिस्कीटचे दुकान चालवण्याचा व्यवसाय करतात. व्यवसायासाठी कर्जाची आवश्यक्ता होती म्हणून 10 एप्रिल 2022 ते 20 मार्च 2023 या दरम्यान अंधेरी वेस्ट येथील काही भामट्यांनी अशपाक तांबोळी यांना वेळोवेळी फोन करून तुम्हाला विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलिसी मॉर्गेज करून त्यावर झीरो टक्के व्याज दराने दिड करोड रुपये कर्ज देतो.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तांबोळी यांनी वेळोवेळी 22 लाख 86 हजार 550 रुपयांच्या विविध 19 कंपनीच्या पॉलिसी काढल्या. सदर पॉलिसी काढणे करीता तांबोळी यांनी 22 लाख 86 हजार 550 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून पाठविले. त्यानंतर तांबोळी यांनी कर्ज काढण्यासाठी वेळोवेळी फोन करुन चौकशी केली. तेव्हा एंजटांनी ‘आज कर्ज देतो, उद्या देतो,’ असे सांगुन आधारकार्ड, पॅनकार्ड, कोर्‍या कागदावर सह्या व्हाट्सप मोबाईलवर पाठविण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे तांबोळी यांनी पाठविले. त्यानंतर एजंटांनी वेळोवेळी उठवा- उडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ केली.

आपली फसवणूक झाल्याचे तांबोळी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी अपर्णा देशमुख,( रा. 202 बी- विंग, सागर टच प्लाझा, साकीनाका रोड, अंधेरी वेस्ट) दिव्या, पुजा जाधव, सोनिया, निधी शर्मा, संदिप सिंग, नेहा जोशी , तनुजा, गणेश कांबळे, नम्रता, पाटील गोरेगाव, संजीव कुमार व पूजा अशा 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस करीत आहेत.

विविध 19 कंपन्यांच्या नावांचा वापर

स्टार युनियन, अविवा इन्शुरन्स, मॅक्स लाईफ इन्शुरन्स, बजाज अलेंझ इंश्युरंन्स, एचडिएफसी लाईफ इंश्युरंन्स, फ्युचर जनरल मेडिक्लेम इंश्युरंन्स, रिलायन्स मेडीकल हेल्थ इंश्युरंन्स, स्टार युरेका इंश्युरन्स अशा विविध 19 कंपनीच्या पॉलिसी काढण्यास सांगून 22 लाख 86 हजार 550 रूपयाला चुना लावला.

हेही वाचा

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा जोरदार पाऊस; ‘या’ दिवशी मुसळधार

नाशिक : साश्रूनयनांनी जवान विकी चव्हाण यांना अखेरचा निरोप

मृत्यूच्या 27 मिनिटांनंतर ‘ती’ पुन्हा झाली जिवंत!

Back to top button