शरद पवारांनी पॅचअप करावे : दीपक केसरकर | पुढारी

शरद पवारांनी पॅचअप करावे : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांचे काम पाहत आले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याशी पॅचअप करावे, सोबत यावे, अशी भावना कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. आरक्षणाबाबत सर्वच काही राज्याच्या हातात असत नाही, यामुळे योग्य मार्गाने मागण्या कराव्यात, असे आवाहनही त्यांनी सोलापुरात झालेल्या प्रकाराबाबत बोलताना केले.

बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली, यानंतर अजित पवार यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांमधील फरक सर्वांनीच पाहिला आहे. हा फरक जाणवण्याइतका होता. अजित पवार यांच्याकडे पक्षातील तरुण मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, पॅचअप करावे, अशी आपली भावना आहे. मात्र, ते मोठे नेते असल्याने आपण याविषयी अधिक काही बोलणार नाही, असेही त्यांनी सांगत कोल्हापूरच्या अजित पवारांच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सर्वांनी समजून घ्यावे

धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर सोलापुरात भंडारा उधळण्यात आला. याविषयी बोलताना केसरकर म्हणाले, आरक्षणाची मागणी योग्य आहे. त्यांच्या भावना आम्ही जाणतो. मात्र, सर्वकाही राज्य शासनाच्या हातात आहे असे नाही. या घटनात्मक बाबी आहेत, न्यायालयीन प्रक्रियाही आहे. विविध प्रक्रियेतून जावे लागते, त्यामुळे सर्वांनी समजून घेऊन योग्य मार्गाने मागणी करावी, असे आवाहनही केले.

दगडफेकीची घटना कट असण्याची शक्यता

जरांगे-पाटील यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते. त्यावेळी दगडफेकीची घटना घडली. मात्र, मराठा समाजाने दगडफेक केली नसून, दुसर्‍या कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे लाठीमार झाला. हा कट असण्याची शक्यता आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मराठा समाजावर लाठीमार केला म्हणून पोलिासांवरही कारवाई झाली. त्यातही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. लाठीमाराचा कुणीही आदेश दिला नाही. तसा आदेश कोण कशाला देईल? तसेच मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे काढून टाकले जातील.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात शेतकर्‍यांच्या बांधावर जात आहेत, या प्रश्नावर पालकमंत्री केसरकर म्हणाले, बांधावर जाऊन राजकारण केले जात आहे. वास्तविक, बांधावर जाऊन प्रश्न सुटत नाहीत, तर शेतकर्‍यांसाठी काय करता येईल, याचे नियोजन करावे लागते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देऊन हायकोर्टात टिकवून दाखविले. त्यांच्यावर टीका करणे अयोग्य आहे.

Back to top button