सोलापूर : पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर फेकला भंडारा | पुढारी

सोलापूर : पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर फेकला भंडारा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला असून, धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर शासकीय विश्रामगृहात भंडारा उधळून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. दरम्यान यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, सोलापुरातील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली.

एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे दोन दिवस सोलापूर दौर्‍यावर आहेत. पहिल्या दिवशी नियोजन बैठका घेऊन मुक्काम केल्यानंतर दुसर्‍या दिवशी शासकीय विश्रामगृहात ते विविध नागरिकांचे निवेदन घेत होते. याच वेळी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांचे कार्यकर्ते सात रस्त्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदन दिले.

कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहे, लवकरात लवकर आरक्षण द्या, असे बोलत असताना अचानक खिशामध्ये हात घालीत कागदामध्ये गुंडाळून आणलेला भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर उधळला, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या लढतोय

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये. जर काहींनी तो मा. राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशीर्वाद समजावा. तसेच मी समस्त माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करतो की, ‘लांडग्या काका’च्या नादाला लागू नका. आपण आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयात लढतोय.

पवित्र भंडार्‍याची माझ्यावर उधळण झाल्याचा मला आनंदच

सोलापुरात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा फेकण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी एक्सवर (ट्विटर) वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. पवित्र भंडार्‍याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच. भंडारा उधळणार्‍यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील! असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

Back to top button