नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात, पाहा गेल्या पाच दिवसांतील आकडेवारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील उद्याने बंद ठेवण्याचा आणि शाळांमध्ये डोळ्यांची साथ पसरू नये, यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून शहरात डोळ्याची साथ नियंत्रणात आल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येचा आकडा सरासरी पाचशेवरून दीडशेपर्यंत खाली आला आहे. रुग्ण संख्या आणखी कमी होईल, असा दावा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन रावते यांनी केला आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातही डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. जुलैपासून या आजाराच्या साथीच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. आॅगस्टमध्ये तर या साथीचा उद्रेक झाला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या या साथीच्या आजाराच्या रुग्णांचा दैनंदिन आकडा पाचशेवर पोहोचला होता. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या या साथीची रुग्णसंख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे महापालिकेने साथ नियंत्रणात आणण्यासाठी १८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सर्व ५५० उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच शाळांमध्ये मुलांचे डोळे आल्यास, त्याला सक्तीची सुट्टी देण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी काढले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर आले असून डोळ्यांची साथ नियंत्रणात आल्याचे आशादायी चित्र आहे. मनपा रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा आकडा पाचशेवरून दीडशेवर आला आहे.
आतापर्यंत ७६४३ रुग्णांची नोंद
सुरुवातीला या आजाराचे दिवसाला ५० ते ६० रुग्ण आढळत होते. त्यानंतर हा आकडा दीडशेच्या घरात गेला. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर हा आकडा पाचशेच्या घरात पोहोचला. खासगी रुग्णालयांमध्ये हा आकडा कितीतरी पटीने अधिक होता. महापालिकेच्या पाच रुग्णालयांसह ३० उपकेंद्रांमध्ये गेल्या ३५ दिवसांत या आजाराच्या ७६४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या पाच दिवसांतील आकडेवारी
२८ ऑगस्ट- १५५
२७ ऑगस्ट -१६१
२६ ऑगस्ट – १६४
२५ ऑगस्ट – १५५
२४ ऑगस्ट – १४४
हेही वाचा :