पुणे : भारतमातेच्या जयघोषात जवानांना बांधल्या राख्या | पुढारी

पुणे : भारतमातेच्या जयघोषात जवानांना बांधल्या राख्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सीमेवर लढताना दिव्यांगत्व आलेले जवान, पण जोश आणि शौर्यात कोणतीही कमतरता नाही…अशा शौर्यवान जवानांच्या हातांवर बहिणींनी राख्या बांधत त्यांच्या देशसेवेला सलाम केला. भारतमातेच्या जयघोषात बहिणींनी रेशीम राख्या बांधल्या अन् वातावरणात देशभक्तीचे रंग बहरले. खडकीच्या अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात हे भारलेले आणि राष्ट्रभक्तीने गुंफलेले क्षण पाहायला मिळाले. सैनिक मित्र परिवाराच्या वतीने जवानांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

या वेळी कर्नल आर. के. मुखर्जी, कर्नल बी. एल. भार्गव, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, स्वाती पंडित, आरती भिसे, निकिता गुजराथी, सुरेखा होले आदी उपस्थित होते. सराफ म्हणाले, कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. सणावारांच्या निमित्ताने देशवासीयांना सीमारक्षकांप्रती आत्मियता व्यक्त करण्याची संधी लाभत असते. 1997 पासून जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात येते. या भावबंधन सोहळ्यात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला मंडळे, वीर नारी, माजी सैनिक, कर्मचारी, युवा स्पंदन संस्था अशा अनेकांचा सहभाग होता.

सीमेवरील जवानांचे आनंदाश्रू
सीमेवर लढताना दुखापत झालेले काही जवान पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या जवानांसोबत केअर टेकर्स सोसायटी संस्थेतील महिलांनी आणि मुलींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सणानिमित्त जवानांच्या हातावर राखी बांधली. काही जवानांच्या डोळ्यात अश्रू आले आणि आनंदाने या सर्व बहिणींकडून त्यांनी राखी बांधून घेतली. बहिणींनीही जवानांना राखी बांधून आम्ही आपल्याबरोबर आहोत, असे सांगितले. सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा :

Stock Market Updates | शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, Jio Financial ची जोरदार सलामी

पुणे विभागात तीव्र पाणीटंचाई !! ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

 

Back to top button