कोटा : करिअरच्या भूलभुलय्यातील फसव्या पाऊलवाटा! | पुढारी

कोटा : करिअरच्या भूलभुलय्यातील फसव्या पाऊलवाटा!

सुनील कदम

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत राजस्थानमधील कोटा हे शहर देशातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचे मुख्य प्रशिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आहे, पण बारकाईने कानोसा घेतल्यास हा सगळा मार्केटिंगचा भूलभुलय्या असल्याचे स्पष्ट होते. जे विद्यार्थी मुळातच हुशार आहेत, अशाच मुलांना हेरून, त्यांनाच आपल्या खासगी क्लासेसमध्ये भरती करून घेऊन तिथल्या क्लासचालकांनी अगदी पद्धतशीरपणे शैक्षणिक बाजार मांडला असल्याचे दिसून येते. या क्लासचालकांतील स्पर्धा आणि प्रशिक्षणाच्या अतिरेकामुळे अलिकडील काही वर्षांत वर्षाकाठी किमान वीस विद्यार्थी आत्महत्या करताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांनीही वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

कोटा शहराला काही फार मोठी शैक्षणिक परंपरा वगैरे आहे, अशातला भाग नाही. उलट एका औद्योगिक अपघातामुळे इथे बाजारू शिक्षणाचा फैलाव झाल्याचे दिसते. कोटा इथे जे. के. सिंथेटिक नावाची एक कंपनी आणि तिच्या काही उपकंपन्या होत्या. कोटा शहराच्या अर्थकारणाचा तो मुख्य आधार होत्या. 1980 साली वेगवेगळ्या कारणांनी ही कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या याच कंपनीतील विनोदकुमार बन्सल नावाच्या एका मेकॅनिकल इंजिनिअरने पोटापाण्यासाठी 1981 साली पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लासेस सुरू केले. त्यानंतर 10 वी, 12 वी असे करीत करीत त्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेसही सुरू केले. 1985 साली याच बन्सल क्लासच्या एका विद्यार्थ्याने जेईई परीक्षेत देशात अव्वल नंबर मिळविला आणि रातोरात बन्सल क्लासेसचे नाव देशभर झाले. लगोलग देशभरातील काही नामवंत क्लासेसनीही कोटा शहरात आपल्या शाखा सुरू केल्या आणि स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून कोटा शहराचा नावलौकिक वाढत गेला.

आज कोटा शहरात वेगवेगळे 150 क्लासेस आहेत. देशभरातील जवळपास दोन लाख विद्यार्थी त्या क्लासेसमधून जेईई, नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील जवळपास पाच हजार विद्यार्थी कोटा इथे दाखल होतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे तीन हजार वसतिगृहे आणि जवळपास तितक्याच खानावळी आहेत. एका-एका विद्यार्थ्यामागे हे खासगी क्लासवाले वीस-वीस लाखांची फी आकारतात, राहण्याचे खाण्यापिण्याचे पैसे वेगळेच, शिवाय विद्यार्थ्यांचा इतर खर्चही आलाच.

या क्लासवाल्यांमध्ये पुन्हा एक अंतर्गत स्पर्धा आहे. आपल्याच क्लासचे सर्वाधिक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये चमकावेत यासाठी हे क्लासचालक विद्यार्थ्यांना जणूकाही अभ्यासाचे मशिनच बनवून टाकतात. रात्रंदिवस नुसता अभ्यास आणि अभ्यास! एकीकडे अभ्यासाचे टेन्शन, दुसरीकडे पालकांच्या अपेक्षांचे ओझे अशामुळे अनेक विद्यार्थी नैराश्याने ग्रासले जातात आणि त्यांच्याकडून शेवटी आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. त्यामुळे पालकांनीही आता कोटा म्हणजे आपल्या मुलाच्या करिअरची गुरूकिल्ली न समजता त्यातील भूलभुलय्या विचारात घेण्याची गरज आहे. तसेच ही परीक्षा म्हणजे आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही, याचेही सर्वांनीच भान ठेवण्याची गरज आहे.
डोळे दीपविणारे कोटामधील अर्थकारण!

कोटा इथल्या क्लासमध्ये शिकविणार्‍या प्रमुख शिक्षकांना वार्षिक 1 ते 2 कोटी रुपयांचा पगार दिला जातो. त्यामुळे अनेक आयआयटीयन्स या क्लासमध्ये नोकर्‍या करतात किंवा स्वत:चा क्लास चालवितात. प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान 10-20 लाखांची फी आकारली जाते. आज कोटा शहरातील 20 टक्के लोकसंख्या ही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्यांच्या पैशाभोवतीच आज संपूर्ण कोटा शहराचे अर्थकारण फिरताना दिसत आहे.

क्लासेसमध्ये अभ्यासाचा अतिरेक…!

सध्या कोटा इथल्याच एका क्लासमध्ये जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याने सांगितले की इथे अभ्यासाचा भयावह अतिरेक आहे. दिवसातील किमान सोळा ते अठरा तास अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचा ताण, तशातच कौटुंबिक अपेक्षांचा तणाव, एकटेपणा, अपयशाची भीती यामुळे बहुतांश विद्यार्थी एका विशिष्ट प्रकारच्या मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे नैराश्यग्रस्त विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.

हुशार कोण ते तुम्हीच ठरवा…!

कोटामधील क्लासमध्ये प्रवेश परीक्षेत 80 टक्के गुण मिळविणार्‍यांनाच प्रवेश दिला जातो. ही प्रवेश परीक्षाही मूळ परीक्षेच्या तोडीचीच असते. अशा परीक्षेत 80 टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी साहजिकच हुशार असणार आहे. अशा विद्यार्थ्याने कोटामध्ये जावून अभ्यास केला किंवा घरी बसून अभ्यास केला तरी यश मिळविणारच! पण आज याच हुशार विद्यार्थ्यांच्या जीवावर कोटामधील क्लासवाल्यांनी आपली दुकानदारी चालविलेली दिसते.

Back to top button